दुबई/तेहरान – ‘खोट्या आणि भपकेबाज घोषणांच्या सहाय्याने इराणच्या जनतेला फितवून सरकार उलथता येईल, असे इराणच्या शत्रूदेशांना वाटले होते. त्यांचे हे डाव सपशेल फसले आहेत’, असा दावा इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांनी केला. राष्ट्राध्यक्ष रईसी असे दावे करीत असले, तरी प्रत्यक्षात इराणमधील निदर्शनांची तीव्रता वाढल्याचे दिसत आहे. इराणच्या सुरक्षा यंत्रणा निदर्शक तसेच त्यांच्या समर्थकांवर कारवाई करून हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करीत आहेत. जखमी निदर्शकांवर उपचार करणारे डॉक्टर्स तसेच निदर्शकांच्या सुटकेसाठी प्रयत्न करणाऱ्या वकिलांवर देखील इराणच्या यंत्रणा निर्दयीपणे कारवाई करीत आहेत.
हिजाबसक्तीच्या विरोधात इराणमध्ये सुरू असलेल्या निदर्शनांना तीन महिने उलटले आहेत. इराणमधील प्रत्येक वर्ग या निदर्शनांना आपले समर्थन देत आहे. महिलांचे अधिकार, लोकशाही या मागण्यांसह सुरू असलेल्या या निदर्शनांनी इराणच्या राजवटीची झोप उडविल्याचा दावा केला जातो. या निदर्शनांमुळे आपल्या सरकारला फरक पडत नसल्याचे इराणचे सरकार सांगत असले तरी ही निदर्शने दडपण्यासाठी इराणच्या सुरक्षा यंत्रणांनी कठोर कारवाई सुरू केली आहे.
या कारवाईमध्ये ६८ मुलांसह ४५० हून अधिक जणांचा बळी गेला. तर १८ हजारांहून अधिक निदर्शनांना ताब्यात घेण्यात आले आहे. यापैकी २६ ते ४० जणांना फाशीची शिक्षा सुनावल्याचा दावा स्थानिक मानवाधिकार संघटना करीत आहे. यातील तिघांना तातडीने फाशी देऊन इराणच्या सरकारने निदर्शने चिरडण्याची तयारी केली होती. याउलट इराणमधील निदर्शनांचा जोर वाढल्याच्या बातम्या येत आहेत. इराणच्या सिस्तान-बलुचिस्तान प्रांतातील जनता सरकारविरोधी निदर्शनांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाली आहे. तर इराणमधील पूर्व व पश्चिम अझरबैजान प्रांतातही हिजाबसक्तीच्या विरोधातील आंदोलनाचा जोर वाढला आहे. इराणच्या सिनेमा व क्रीडा क्षेत्राशी संबंधित अनुक्रमे कलाकार व खेळाडूंनी आंदोलनाला जाहीरपणे पाठिंबा दिला आहे. याप्रकरणी इराणच्या सुरक्षा यंत्रणांनी आंतरराष्ट्रीय ख्यातीची इराणी अभिनेत्री तारानेह अलीदुस्ती हिला ताब्यात घेतले. काही दिवसांपूर्वीच इराणच्या यंत्रणांनी प्रसिद्ध फुटबॉलपटूला फाशीची शिक्षा सुनावली होती.
इराणने ताब्यात घेतलेल्या निदर्शकांच्या सुटकेसाठी प्रयत्न करणारे वकील व याची बातमी करणाऱ्या पत्रकारांनाही सुरक्षा दलांनी अटक केल्याचा दावा ब्रिटनस्थित इराणी वृत्तसंस्थेने केला आहे. जखमी निदर्शकांवर उपचार करणारी महिला डॉक्टर अईदा रोस्तामी हिला इराणच्या यंत्रणांनी ताब्यात घेऊन तिचा छळ केला. यामध्ये डॉक्टर रोस्तामी यांचा बळी गेल्याचा आरोप होत आहे.
दरम्यान, हिजाबसक्तीच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाबरोबरच इराणच्या सरकारला आणखी दोन आव्हानांचा सामना करावा लागत आहे. इराणमधील इंधन कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी शनिवारपासून पगारवाढीसाठी निदर्शने सुरू केली आहेत. याचा थेट परिणाम इराणच्या दक्षिणेकडील इंधन कंपन्यांच्या उत्पादकतेवर होत आहे. तर देशव्यापी निदर्शनांमुळे गेल्या तीन महिन्यात इराणचे चलन रियालच्या दरात २० टक्क्यांनी घट झाल्याचा दावा केला जातो.