इराण कासेम सुलेमानी यांच्या हत्येचा सूड घेतल्यावाचून राहणार नाही

- ‘आयआरजीसी’चे मेजर जनरल हुसैन सलामी

हत्येचा सूडतेहरान – ‘पूर्व मेडिटेरियन क्षेत्रापासून ते पूर्व अफगाणिस्तानपर्यंतचे क्षेत्र आपल्या टाचेखाली आणण्याचे कारस्थान इराणच्या शत्रूंनी आखले होते. पण लेफ्टनंट जनरल कासेम सुलेमानी यांनी हे सारे कारस्थान उधळून लावले. अशा कासेम सुलेमानी यांची हत्या करून मोठी घोडचूक करणाऱ्यांना इराण कधीही माफ करणार नाही. आज नाही तर उद्या सुलेमानी यांच्या हत्येचा सूड घेतला जाईल’, अशी डरकाळी इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्युशन गार्ड्‌‍स कॉर्प्स’चे (आयआरजीसी) प्रमुख मेजर जनरल हुसैन सलामी यांनी फोडली आहे.

3 जानेवारी 2020 रोजी अमेरिकेने इराकच्या बगदादमध्ये ड्रोन हल्ला चढवून लेफ्टनंट जनरल कासेम सुलेमानी यांना ठार केले होते. त्याला तीन वर्ष झाली असून अजूनही इराणची राजवट सुलेमानी यांच्या हत्येचा सूड घेण्याच्या धमक्या देत आहे. रविवारी इराणच्या केरमान शहरात पार पडलेल्या कार्यक्रमात आयआरजीसीचे प्रमुख मेजर जनरल हुसैन सलामी यांनी सुलेमानी यांच्या बलिदानाची प्रशंसा करून त्यांनी इराणचा गौरव वाढविल्याचा दावा केला. इराणच्या शत्रूंना पूर्व मेडिटेरियन क्षेत्रापासून ते अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील भागापर्यंतचे क्षेत्र आपल्या टाचेखाली आणायचे होते. पण सुलेमानी यांनी त्यांचा हा कट उधळून इराणच्या शत्रूंची कारस्थाने धुळीला मिळविली, असे मेजर जनरल हुसैन सलामी म्हणाले. इराणचे महान सेनानी असलेल्या सुलेमानी यांची हत्या घडवून शत्रूने फार मोठी चूक केलेली आहे. त्याचा सूड घेतल्याखेरीज इराण स्वस्थ बसणार नाही, अशी धमकी मेजर जनरल हुसैन सलामी यांनी दिली.

इराणसमोर अनेक समस्या आहेत आणि आपला देश या समस्यांशी झुंजत आहे. पण काही झाले तरी इराण शत्रूसमोर गुडघे टेकणार नाही, असेही मेजर जनरल हुसैन सलामी पुढे म्हणाले. सध्या इराणमध्ये सुरू असलेल्या राजवटीविरोधी निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर सलामी यांनी केलेली विधाने लक्ष वेधून घेणारी आहेत. इराणच्या राजवटीविरोधीताल निदर्शनांच्या मागे अमेरिका, ब्रिटन, इस्रायल व सौदी अरेबियाचा हात असल्याचा आरोप इराणकडून केला जातो. म्हणूनच या निदर्शकांवर कठोर कारवाई केल्याखेरीज पर्याय नाही, असे सांगून इराणने निदर्शकांना फासावर लटकवण्याचा सपाटा लावला आहे.

मात्र अशारितीने आपल्या देशातील निदर्शकांवर कारवाई करणे चुकीचे ठरेल, असे इराणच्या राजवटीतील काहीजणांचे म्हणणे असून निदर्शकांवरील कारवाईबाबत राजवटीमध्ये दोन मतप्रवाह असल्याचे समोर आले आहे. यामुळे निर्माण झालेले मतभेद इराणच्या राजवटीसाठी घातक ठरू शकतात. अशा परिस्थितीत लेफ्टनंट जनरल कासेम सुलेमानी यांच्या स्मृती जागवून इराणच्या लष्कराकडून आपल्या देशांच्या शत्रूंची कारस्थाने पुन्हा एकदा आक्रमकपणे इराणच्या जनतेसमोर मांडण्याची तयारी केली आहे. इराणमधील निदर्शकांनी कासेम सुलेमानी यांच्या विरोधातही घोषणा दिल्या होत्या. त्याचा दाखला देऊन निदर्शक इराणच्या शत्रूंची भाषा बोलत असल्याचे संकेत इराणचे वरिष्ठ अधिकारी देऊ पाहत आहेत.

हिंदी

leave a reply