वॉशिंग्टन – अमेरिकेचे संरक्षणदलप्रमुख मार्क मिले यांनी सिरियातील अमेरिकी लष्कराच्या तळाला आकस्मिक भेट दिली. सिरियामध्ये अजूनही अमेरिकेचे सुमारे 900 जवान तैनात असल्याचे सांगितले जाते. अमेरिका व अमेरिकेच्या मित्रदेशांना सुरक्षित ठेवण्यासाठी या तैनातीची जोखीम पत्करणे अत्यावश्यकच ठरते, असा दावा यावेळी अमेरिकी संरक्षणदलप्रमुखांनी केला. अमेरिकेची ही तैनाती ‘आयएस’ या दहशतवादी संघटनेला पुन्हा सिरियात डोके वर काढण्याची संधी देणार नाही, असा विश्वास जनरल मिले यांनी व्यक्त केला आहे.
आयएस अर्थात इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने 2014 साली सिरियातील गृहयुद्धाचा लाभ घेऊन आपला विस्तार केला होता. आयएसच्या दहशतवाद्यांनी सिरियातील काही भाग ताब्यात घेतल्यानंतर, अमेरिकेने आयएसवरील कारवाईसाठी लष्करी तैनाती केली होती. मात्र 2017 साली तत्कालिन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सिरियातील अमेरिकन लष्कर मागे घेतले होते. पण आजही अमेरिकेचे सुमारे 900 जवान सिरियामध्ये तैनात आहेत.
सिरियात पुन्हा एकदा आयएस ही दहशतवादी संघटना आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याची तयारी करीत असल्याचा दावा केला जातो. अशा परिस्थितीत जनरल मार्क मिले यांनी सिरियातील अमेरिकन लष्कराच्या तळाला आकस्मिक भेट दिली. यावेळी त्यांनी आयएसपासून संभवणाऱ्या धोक्याची जाणीव करून देऊन त्याविरोधात अमेरिकेला सिरियामध्ये लष्करी तैनाती कायम ठेवणे भाग असल्याचे बजावले. इथे लष्करी तैनातीची जोखीम पत्करणे आवश्यकच आहे. अमेरिका व अमेरिकेचे सहकारी देश सुरक्षित ठेवण्यासाठी ही तैनाती गरजेची असल्याची खात्री आपल्याला पटलेली आहे, असा दावा यावेळी जनरल मार्क मिले यांनी केला. इथे तैनात असलेले अमेरिकेचे लष्कर आयएससारख्या दहशतवादी संघटनेला सिरियात पुन्हा डोके वर काढण्याची संधीच देणार नाही, असे सांगून जनरल मिले यांनी अमेरिकेच्या या तैनातीचे समर्थन केले.
सिरियामध्ये अस्साद राजवटीच्या विरोधात सुरू झालेल्या सशस्त्र उठावानंतर या देशातील परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. राष्ट्राध्यक्ष अस्साद यांच्या राजवटीने आपल्या देशाच्या बऱ्याचशा भूभागावरील नियंत्रण गमावले आहे. आयएसचे दहशतवादी, कुर्द बंडखोर, इराणसंलग्न व इस्रायलविरोधी संघटना सिरियामध्ये सक्रीय आहेत. त्याचवेळी इस्रायल व तुर्कीसारखे देश आपल्या सुरक्षाविषयक हितसंबंधांचा दाखला देऊन सिरियाच्या भूभागात जोरदार हल्ले चढवित आहेत. अशा परिस्थितीत अमेरिकेच्या संरक्षणदलप्रमुखांनी सिरियाला दिलेली आकस्मिक भेट लक्षवेधी ठरत आहे.