जपान-दक्षिण कोरिया सहकार्याचा नवा अध्याय सुरू झाला आहे

- जपानच्या पंतप्रधानांची घोषणा

टोकिओ – ‘वेळेआधीच वसंत ॠतूचे आगमन झाले आहे, टोकिओमधील वृक्षांना बहर आला आहे. जपान व दक्षिण कोरियातील सहकार्याचा नवा अध्याय सुरू झाला आहे’, अशी घोषणा जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांच्याबरोबरच्या बैठकीत केली. तर या बैठकीमुळे उभय देशांमधील संबंध नव्याने सुरू होत असल्याचा विश्वास दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष युन सूक येओल यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर क्षेत्रीय सुरक्षाविषयक आव्हानांचा सामना करण्याचे दोन्ही नेत्यांनी जाहीर केले. दरम्यान, जपान व दक्षिण कोरियामधील या सहकार्याचा चीनने कडक शब्दात निषेध नोंदविला आहे.

जपान-दक्षिण कोरिया सहकार्याचा नवा अध्याय सुरू झाला आहे - जपानच्या पंतप्रधानांची घोषणा1910 ते 1945 या काळात जपानच्या राजवटीने कोरियन तसेच चिनी जनतेवर अमानुष अत्याचार केले होते. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात जपानचे धोरण पूर्णपणे बदलले खरे. मात्र कोरियन जनतेमध्ये आजही जपानच्या विरोधात तीव्र भावना आहेत. याचा अपरिहार्य परिणाम दोन्ही देशांच्या संबंधांवर झाला. 2011 सालापासून या संबंधातील कटूता वाढली होती. तर 2018 सालापासून तर दोन्ही देशांमधील सुरक्षाविषयक चर्चा देखील बंद पडली होती.

पण गेल्या वर्षी दक्षिण कोरियाची सूत्रे हाती घेणाऱ्या राष्ट्राध्यक्ष युन सूक येओल यांनी 12 वर्षानंतर जपानबरोबरचे संबंध नव्याने प्रस्थापित करण्यासाठी पावले उचलली आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष येओल यांनी गुरुवारी जपानचा दौरा करून आर्थिक, व्यापारी तसेच लष्करी स्तरावरील सहकार्य विकसित करण्याची घोषणा केली. दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचण्यांचा थेट उल्लेख करून आपल्या शेजारी कम्युनिस्ट राजवटीपासून आंतरराष्ट्रीय शांती व स्थैर्याला धोका असल्याचा इशारा दिला.

जपानच्या पंतप्रधानांनी देखील उत्तर कोरियापासून असलेल्या धोक्याकडे लक्ष वेधले. पण इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या धोक्याचा थेट उल्लेख करण्याचे टाळले. सध्याच्या परिस्थितीत या क्षेत्राच्या सुरक्षेसाठी जपान व दक्षिण कोरियातील लष्करी सहकार्य आवश्यक असल्याचे पंतप्रधान किशिदा यांनी स्पष्ट केले. घोषित केले नसले तरी पंतप्रधान किशिदा दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांना मे महिन्यात होणाऱ्या जी7च्या बैठकीसाठी आमंत्रित करण्याची दाट शक्यता जपानी माध्यमे वर्तवित आहेत.

दरम्यान, अमेरिकेने देखील जपान व दक्षिण कोरियाच्या राष्ट्रप्रमुखांमधील या भेटीचे स्वागत केले. यामुळे स्वतंत्र आणि खुल्या इंडो-पॅसिफिक क्षेत्राबाबत असलेली धोरण राबविण्यास अमेरिकेला सहाय्य मिळेल, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

पंतप्रधान किशिदा व राष्ट्राध्यक्ष येओल यांच्या भेटीमुळे चीनची चलबिचल वाढली आहे. या बैठकीच्या माध्यमातून जपान व दक्षिण कोरिया या क्षेत्रात विशेष लष्करी गट उभारण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप चीनने केला. म्हणूनच चीन अशा गटाच्या उभारणीचा कडक शब्दात निषेध करीत असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे.

हिंदी

 

leave a reply