इराणने अमेरिकेच्या आण्विक पाणबुडीचा डाव उधळला

इराणच्या नौदल अधिकाऱ्याचा दावा

us submarineतेहरान – इराणबरोबर वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पर्शियन आखातात आण्विक पाणबुडी तैनात केल्याची घोषणा अमेरिकेने केली होती. ही पाणबुडी पर्शियन आखातात शांतपणे आणि छुप्यारितीने गस्त घालत राहील, असा दावा अमेरिकेने केला होता. तर या तैनातीद्वारे अमेरिकेने आखातातील आपल्या मित्रदेशांना आश्वस्त केले होते. पण अमेरिकेच्या या अतिप्रगत आण्विक पाणबुडीला इराणच्या पाणबुडीने हेरले आणि तिला होर्मुझच्या पृष्ठभागाशी येण्यास भाग पाडले, अशी घोषणा इराणच्या वरिष्ठ नौदल अधिकाऱ्याने केली.

दहा दिवसांपूर्वी, १५४ टॉमाहॉक क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेली ‘युएसएस फ्लोरिडा’ ही आण्विक पाणबुडी आखातात तैनात केल्याची घोषणा अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय पेंटॅगॉनने केली होती. पाणबुडी ही नौदलाच्या ताफ्यातील छुपे शस्त्र म्हणून ओळखले जाते. त्यामुळे जगातील कुठलाही देश कधीही आपल्या पाणबुड्यांच्या तैनातीची माहिती उघड करीत नाही. पण अमेरिकेने पहिल्यांदाच आपल्या पाणबुडीच्या तैनातीची घोषणा करुन इराणला इशारा दिल्याचा दावा केला जात होता. आखातातील सुरक्षा आणि स्थैर्य अबाधित राखण्यासाठी या पाणबुडीची तैनाती असून बाहरिन येथील अमेरिकेच्या पाचव्या आरमारात ही पाणबुडी तैनात असेल, असेही पेंटॅगॉनने स्पष्ट केले होते. त्यानंतर या पाणबुडीने पर्शियन आखातात गस्त सुरू केल्याच्या बातम्याही आल्या होत्या.

iran fateh subarineपण गुरुवारी इराणचे नौदल कमांडर शाहराम इरानी यांनी ‘युएसएस फ्लोरिडा’ची छुपी गस्त उधळून लावल्याचे जाहीर केले. ‘‘अमेरिकेची पाणबुडी पाण्याखालून छुप्यारितीने होर्मुझच्या आखातात प्रवेश करीत असताना इराणनिर्मिती ‘फतेह’ पाणबुडीने तिला हेरले. त्याचबरोबर अमेरिकन पाणबुडीच्या भोवती फेऱ्या घालून तिला पृष्ठभागावर येण्यास भाग पाडले’’, अशी माहिती ॲडमिरल इरानी यांनी स्थानिक वृत्तवाहिनीला माहिती दिली.

यानंतर इराणने अमेरिकेच्या पाणबुडीला इशारा दिल्याची माहितीही ॲडमिरल इरानी यांनी दिली. ‘इराणच्या सागरी हद्दीत विनापरवानगी प्रवेश करणाऱ्या अमेरिकेच्या पाणबुडीने आपला मार्ग बदलावा. तसेच यापुढे अमेरिकेच्या जहाजाने इराणच्या सागरी हद्दीचे उल्लंघन करू नये’, अशी ताकीद दिल्याचे ॲडमिरल इरानी यांनी सांगितले. यानंतर अमेरिकन पाणबुडीने आपला मार्ग बदलला व इराणच्या जहाजांनी तिला सागरीहद्दीबाहेर नेऊन सोडले, असा दावा इरानी यांनी केला.

अमेरिकेच्या पाचव्या आरमाराने इराणचा हा दावा फेटाळला. अमेरिकेच्या पाणबुडीला हेरले, हा इराणचा दावा अतिशय चुकीचा आहे. अमेरिकेच्या पाणबुडीने गेले काही दिवस होर्मुझच्या आखातातून प्रवास केलाच नसल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. इराण चुकीची माहिती पसरवीत असल्याचा आरोप अमेरिकेने केला.

leave a reply