डॉलरमधील उलथापालथींच्या पार्श्वभूमीवर चीनसह अनेक देशांकडून सोन्याच्या खरेदीत मोठी वाढ

china goldबीजिंग/इस्तंबूल – अमेरिकी डॉलरच्या मूल्यात होणाऱ्या उलथापालथींच्या पार्श्वभूमीवर चीनसह अनेक देशांनी सोन्याच्या खरेदीत मोठ्या प्रमाणात वाढ केल्याची माहिती उघड झाली आहे. जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत तुर्की, उझबेकिस्तान व भारताच्या मध्यवर्ती बँकांनी सोन्याची खरेदी केल्याची माहिती ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने दिली आहे. या देशांव्यतिरिक्त चीनदेखील सोन्याच्या साठ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भर टाकत असल्याचा दावा ‘निक्केई आशिया’ या जपानी वेबसाईटने केला.

‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’च्या अहवालानुसार, जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत ३९९.३ टन सोन्याची खरेदी करण्यात आली. यातील सुमारे ९० टन सोने तुर्की, उझबेकिस्तान व भारताच्या मध्यवर्ती बँकांकडून खरेदी करण्यात आले. तुर्की व उझबेकिस्तानने ऑक्टोबर महिन्यातही मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली. तुर्कीने नऊ टन तर उझबेकिस्तानने ९.७ टन सोन्याची खरेदी केल्याचे कौन्सिलकडून सांगण्यात आले.

dollar-upheavalजुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत झालेल्या खरेदीपैकी तुर्की, उझबेकिस्तान व भारतवगळता इतर देशांची माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे जवळपास ३०० टन सोने कोणत्या देशाने खरेदी केले, यावर तर्कवितर्क सुरू झाले आहेत. जपानच्या माध्यमांनी ही खरेदी चीनकडून करण्यात आली असावी, असा दावा केला आहे. ही खरेदी रशियाकडून केल्याचेही दाव्यात सांगण्यात आले. रशिया अथवा चीन या दोन्ही देशांनी यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.

चीनच्या यंत्रणांनी यापूर्वीही सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी केली होती. मात्र त्याची आकडेवारी कधीच जाहीर केली नव्हती. उपलब्ध आकडेवारीनुसार चीनकडे एक हजार टनांपेक्षा अधिक सोने असल्याचे दिसून आले आहे. मात्र सोन्याच्या बाजारपेठेशी संबंधित काही विश्लेषक तसेच वेबसाईट्सची चीनकडील राखीव सोन्याचे साठे १० हजार टनांपर्यंत असावे, असे दावे केले आहेत. चीन हा जगातील आघाडीच्या सोन्याच्या उत्पादकांपैकी एक असल्याकडेही या विश्लेषकांनी लक्ष वेधले होते.

हिंदी

leave a reply