अलिबाबा, हुवेईसह सात चिनी कंपन्यांवर कारवाई होणार

नवी दिल्ली – सुरक्षेच्या कारणावरून ५९ चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातल्यावर भारत सरकार सात चिनी कंपन्यांवर लवकरच कारवाई करू शकते अशा बातम्या आहे. या सातही कंपन्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या चीनच्या लष्कराशी जोडलेल्या असल्याचा अहवाल आहे आणि सुरक्षायंत्रणा या कंपन्यांकडे बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे वृत्त आहे. या सात कंपन्यांमध्ये अलिबाबा, हुवेई, टेन्सेन्टसारख्या कंपन्याचा समावेश आहे. भारत सरकारने या कंपन्यांवर कारवाई केल्यास चीनसाठी हा आणखी एक मोठा दणका ठरू शकतो.

India-Chinaचिनी लष्कराशी थेट किंवा अप्रत्यक्ष संबंध असलेल्या किमान सात चिनी कंपन्यांची ओळख सरकारने पटविल्याचा दावा सरकारी सूत्रांच्या हवाल्याने करण्यात आला आहे. यामध्ये बहुराष्ट्रीय कंपनी अलिबाबा, हुवेई, टेन्सेन्ट या कंपन्यांचा समावेश आहे. तसेच शिंडिया स्टील्स, शिंशिन्ग कॅथे इंटरनॅशनल, चायना इलेक्ट्रॉनिक्स टेक्नोलॉजी ग्रुप, एसएआयसी मोटर कॉर्पोरेशन या कंपन्याही चिनी लष्कराशी संबंधित असल्याचा अहवाल भारताच्या गुप्तचर संस्थेने दिल्याचे वृत्त आहे.

या सात कंपन्यांची भारतात तंत्रज्ञान क्षेत्रात फार मोठी गुंतवणूक आहे. अलिबाबाने भारतात कित्येक स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केलेली आहे. तसेच टेन्सेन्टनेही ओला, फ्लिपकार्ट सारख्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेली आहे. चीन आपल्या ‘मिलिट्री-सिव्हील फ्यूजन पॉलिसी’ अंतर्गत काही कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो आणि त्यांच्या तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्या संरक्षणासाठी करतो. अलिबाबा आणि टेन्सेन्ट चीनच्या याच धोरणाचा भाग असल्याचे संगितले जाते.

हुवेईवर यापूर्वीच हेरगिरीचे आरोप आहेत आणि जगातील प्रमुख देशांनी या कंपनीवर बंदीची कारवाई केलेली आहे. तसेच चायना इलेक्ट्रॉनिक्स टेक्नोलॉजी ग्रुप या कंपनीवर लष्करी हेरगिरी आणि शिंजियांग प्रांतात मानवाधिकाराच्या उल्लंघन करण्यासाठी तंत्रज्ञान पुरविल्याचा आरोप आहे. तीन आठवड्यांपूर्वीच अमेरिकेने चिनी लष्कराशी संबंधित २० कंपन्यांची यादी तयार केल्याचे वृत्त आले होते. या कंपन्यांवर लवकरच निर्बंध लादले जाऊ शकतात, असाही दावा करण्यात आला होता. त्यानंतर भारतही चिनी लष्कराशी संबंधित कंपन्यांची ओळख पटविण्यात येत असल्याचे वृत्त महत्वाचे ठरते.

सध्यातरी या सात कंपन्यांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून लवकर या कंपन्यांवर भारत सरकार कारवाई करू शकते, असे वृत्तात म्हटले आहे. या कंपन्यांवर काय कारवाई केली जाईल, हे अजून निश्चित झाले नसल्याचा दावा सूत्रांच्या हवाल्याने करण्यात आला आहे.

भारताने आधीच ५९ चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातल्यामुळे चिनी कंपन्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. ‘अलिबाबा’ने आपल्या ‘यूसी ब्राउझर’ आणि ‘यूसी न्यूज’चा भारतातील व्यवसाय गुंडाळण्यास सुरुवात केली आहे. त्यातच भारत सरकारने या कंपन्यांवर कारवाई केल्यास चीनसाठी हा आणखी एक जबरदस्त धक्का ठरू शकतो.

leave a reply