नवी दिल्ली – कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले असल्याने नागरिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर भविष्य निर्वाह निधीतून (ईपीएफ ) नॊकरदार आपल्या खात्यातून रक्कम काढण्याची मुभा सरकारने दिली आहे. हा कोट्यवधी ईपीएफ धारकांसाठी मोठा दिलासा ठरतो.
भविष्य निर्वाह निधीतून रक्कम काढता यावी यासाठी कामगार आणि रोजगार मंत्रालयाने पीएफमच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. नव्या सुधारणेनुसार तीन महिन्यांचे मूळ वेतन आणि महागाई भत्ता यांची एकत्रित रक्कम किंवा कामगारांच्या खात्यात एकूण जमा निधीच्या 75 टक्के यापैकी जे कमी असेल तेवढी रक्कम खातेधारकांना काढता येईल. तसेच ही रक्कम परत खात्यात भरणे बंधनकारक नसेल.
रविवारी रात्री पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यासाठी यूनिफाईड नंबर पोर्टलवर लॉगइन करून दाव्या संदर्भांत अर्ज भरावा लागेल. सदस्यांकडून आलेल्या अर्जांवर तातडीने योग्य कारवाई करण्याचे आदेश कामगार भविष्य निर्वाह निधी संघटनेने सर्व प्रादेशिक कार्यालयांना दिले आहेत.