किव्ह/जेरूसलेम – ‘तुमच्या जागी मी असतो, तर युक्रेनी नागरिकांच्या जीवाचा विचार करून रशियाचा प्रस्ताव स्वीकारला असता’, असा सल्ला इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना दिला. युक्रेनच्या अधिकार्याने इस्रायली माध्यमांना ही माहिती दिली. इस्रायलने हे वृत्त नाकारले. रशिया-युक्रेनमध्ये संघर्षबंदी घडवून आणण्याचा प्रयत्न इस्रायल करीत असल्याचे इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे.
चार दिवसांपूर्वी इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी रशियाचा दौरा करून राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची भेट घेतली. त्यानंतर परतीच्या मार्गावर असताना पंतप्रधान बेनेट यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदोमीर झेलेन्स्की यांच्याशी तीन वेळा फोनवरुन चर्चा केली. या युद्धात रशियाच्या विरोधात युक्रेनला लष्करी सहाय्य पुरविण्याचे आवाहन अमेरिकेने इस्रायलला केले होते. इस्रायलने त्याला साफ नकार दिला होता.
इस्रायलचे रशिया आणि युक्रेनबरोबरही चांगले सहकार्य आहे. त्यामुळे अमेरिका व युरोपिय देशांच्या दबावासमोर न झुकता इस्रायलने या संघर्षात युक्रेनला लष्करी सहाय्य नाकारून तटस्थ भूमिका घेतली होती. अशा परिस्थितीत इस्रायलच्या पंतप्रधानांनी रशियाच्या दौर्यानंतर युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा केली होती. रशिया आणि युक्रेनमध्ये संघर्षबंदी घडवून आणण्यासाठी इस्रायलने घेतलेला पुढाकार लक्ष वेधून घेणारा ठरला होता.
पण युक्रेनच्या वरिष्ठ अधिकार्याने इस्रायली माध्यमांशी बोलताना, पंतप्रधान बेनेट यांनी युक्रेनला रशियासमोर शरण जाण्याचा सल्ला दिल्याचा आरोप केला. पण झेलेन्स्की यांचे सरकार रशियासमोर झुकणार नसल्याचे या अधिकार्याने सांगितले.
क्रिमिआवरील रशियाचा दावा युक्रेनने मान्य करावा, तसेच डोनेस्क आणि लुहान्स्क यांचे स्वतंत्र अस्तित्व कबुल करावे व नाटोतील सहभागाचा विचार सोडून द्यावा, या रशियाच्या मागण्या आहेत. जेरूसलेममध्ये रशिया-युक्रेनच्या नेत्यांची चर्चा घडविण्यासाठी इस्रायल तयार असल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. पण युक्रेनने इस्रायलचा हा प्रस्ताव नाकारला होता.
दरम्यान, इस्रायलने या संघर्षाबाबत तटस्थ भूमिका सोडून द्यावी, अशी मागणी अमेरिका व नाटो करीत आहे. अमेरिकेच्या काही नेत्यांनी इस्रायलवर टीका केल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. तर युक्रेनने देखील लष्करी सहाय्य नाकारणार्या इस्रायलवर ताशेरे ओढले होते. मात्र बायडेन प्रशासनाने इराणबरोबर अणुकरारासाठी पुढाकार घेऊन इस्रायलचे सारे आक्षेप धुडकावले होते. त्याची परतफेड इस्रायल युक्रेनच्या प्रश्नावर अमेरिकेला सहाय्य करण्याचे नाकारून करीत आहे. त्याचवेळी सध्या रशियाने पाश्चिमात्य देशांबरोबरील इराणचा अणुकरार रोखून धरला आहे. ही बाब इस्रायलसाठी अनुकूल ठरते. त्यामुळे सध्या रशिया व इस्रायलचे हितसंबंध एकसमान असल्याचे दिसते. इराणबरोबर अणुकरार करून अमेरिकेला जागतिक पातळीवरील इंधनाचा पुरवठा वाढवायचा आहे.
अणुकरार झाला की इराणवरील निर्बंध मागे घेतले जातील व या देशाचे इंधन जागतिक बाजारपेठेत येईल. सध्या युक्रेनच्या युद्धामुळे व रशियावर लादलेल्या निर्बंधांमुळे इंधनाचे कडाडलेले दर कमी होतील व अमेरिका दडपणातून मुक्त होईल, अशी बायडेन प्रशासनाची योजना आहे. सध्या तरी रशिया व इस्रायल तसेच आखाती देश अमेरिकेची ही योजना प्रत्यक्षात उतरू न देण्यासाठी तयारी करीत आहेत. त्यासाठी इस्रायल व सौदी-युएईसारखे इराणविरोधात खडे ठाकलेले आखाती देश सध्या रशियाच्या मागे उभे असल्याचे दिसते.