अफगाणी लष्कराच्या कारवाईत 91 तालिबानी ठार

- तालिबानच्या हल्ल्यात 10 अफगाणी जवानांचा बळी

91 तालिबानी

काबुल – अफगाणिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांनी गेल्या 72 तासात केलेल्या कारवाईत 91 तालिबानी ठार झाले आहेत. एकट्या कंदहारमधील कारवाईत 63 तालिबानींचा खातमा केल्याची माहिती अफगाणी लष्कराने प्रसिद्ध केली. तर कुंदूझ प्रांतात तालिबानने चढविलेल्या हल्ल्यात 10 अफगाणी जवानांचा बळी गेल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, अफगाणी लष्कर तालिबानवर ही कारवाई करीत असताना, अफगाण सरकार आणि तालिबानच्या नेत्यांमधील वाटाघाटी यापुढेही सुरू राहणार असल्याचा दावा केला जातो.

अफगाणिस्तानच्या ‘नॅशनल डायरेक्टरेट ऑफ सिक्युरिटी’ (एनडीएस) या राष्ट्रीय गुप्तचर आणि सुरक्षा विभागाने कंदहार प्रांतात तालिबानविरोधात मोठी मोहिम छेडली आहे. कंदहार प्रांतातील पंजवाई, झारी, अरघानदाब आणि मैवांद या चार जिल्ह्यांमधील तालिबानच्या ठिकाणांवर ‘एनडीएस’च्या जवानांनी ही कारवाई केली. गेल्या 72 तासांच्या या कारवाईत सात आत्मघाती दहशतवाद्यांसह एकूण 63 तालिबानी ठार झाले. तर 29 तालिबानी जखमीही झाले. या व्यतिरिक्त अफगाणिस्तानात घातपात घडविण्यासाठी सज्ज केलेले 15 सुरुंग आणि स्फोटकांचा साठा यावेळी निकामी करण्यात आला.

91 तालिबानी

गेल्या काही दिवसांपासून ‘एनडीएस’ आणि अफगाणी लष्कर अमेरिकी सुरक्षा यंत्रणेच्या सहाय्याने कंदहार प्रांतातील कारवाईत गुंतलेले आहेत. 9 डिसेंबरपासून या भागात झालेल्या कारवाईत 150 हून अधिक तालिबानींना ठार केल्याचे अफगाणी संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. कंदहार व्यतिरिक्त अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील गझ्नी प्रांतातील ‘मुल्ला नूह बाबा’ या भागात केलेल्या कारवाईत 18 तालिबानींचा खातमा केला. या कारवाईत देखील तालिबानच्या तळावरुन जप्त केलेला शस्त्रसाठा नष्ट करण्यात आला.

तालिबानने देखील रविवारी रात्री कुंदूझ प्रांतात अफगाणी सुरक्षा यंत्रणेच्या जवानांवर हल्ले चढविले. या हल्ल्यात 10 जवान ठार झाले असून यामध्ये पोलीस कमांडरचाही समावेश आहे. या कारवाईनंतर अफगाणी लष्कराने कुंदूझ प्रांतात मोहिम हाती घेतल्याचा दावा केला जातो. गेल्या काही आठवड्यांपासून अफगाणी लष्कराने तालिबानविरोधातील मोहिम तीव्र केली आहे. अफगाणी लष्कराच्या या कारवाईला अमेरिकी लष्कराकडूनही सहाय्य मिळत आहे. दोन दिवसांपूर्वीच अमेरिकेने अफगाणिस्तानच्या कंदहार प्रांतातील तालिबानच्या ठिकाणांवर हवाई हल्ले चढविल्याचे अमेरिकी लष्कराच्या प्रवक्त्यांनी जाहीर केले होते.

91 तालिबानी

या वर्षी फेब्रुवारी महिन्यात अमेरिका आणि तालिबान यांच्यात संघर्षबंदी झाली होती. मात्र तालिबानबरोबर झालेल्या संघर्षबंदीच्या चौकटीत राहूनच ही कारवाई केल्याचे या लष्करी प्रवक्त्याने स्पष्ट केले. कंदहार प्रांतातील झारी जिल्ह्यात तालिबानचे दहशतवादी अफगाणी लष्करावर हल्ल्याच्या तयारीत असताना हे हवाई हल्ले चढविल्याची माहिती या लष्करी प्रवक्त्याने दिली. त्यामुळे अमेरिकेने तालिबानबरोबर संघर्षबंदी केली असली तरी अफगाणी जनतेच्या आणि लष्कराच्या सुरक्षेसाठी दहशतवादविरोधी कारवाईत बदल होणार नसल्याचे अमेरिकेने बजावले आहे.

दरम्यान, अफगाणिस्तानच्या सरकारने देखील तालिबानच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर कतार येथे सुरू असलेल्या शांतीचर्चेचा महत्त्वाचा टप्पा पुढच्या महिन्यात सुरू होईल, असे जाहीर केले. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या वाटाघाटी पार पडतील, अशी माहिती अफगाण सरकारने दिली.

leave a reply