काबुल – शनिवारी अफगाणिस्तानच्या फरयाब प्रांतात सुरक्षादलाने कारवाईत ४६ तालिबानी ठार झाले. तालिबानने फरयाबमधल्या कैसर जिल्ह्यावर आणि हेरात प्रांतातल्या पोलीस मुख्यालय आणि बाजारपेठांना लक्ष्य करुन हल्ले चढविले आहेत. तालिबानच्या या हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना, अफगाणी सुरक्षादल आणि तालिबानमध्ये संघर्ष पेटला. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अफगाण सरकारने शंभरहून अधिक तालिबानी कैद्यांना मुक्त केले. मात्र तालिबानी दहशतवादी अफगाणिस्तानमधील सरकारविरोधी संघर्षात पुन्हा उतरतील, असा इशारा एका अहवालातून देण्यात आला आहे.
शनिवारी तालिबानने अफगाणिस्तानातल्या फरयाब प्रांतात हल्ला चढविण्याचा प्रयत्न केला. पण सुरक्षा दलाच्या सतर्कतेमुळे तालिबानचा हा हल्ला उधळण्यात आला. यावेळी झालेल्या चकमकीत ४६ तालिबानी ठार झाले असून ३७ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये तालिबानी कमांडर असल्याची माहिती अफगाणिस्तानच्या ‘शहीन कॉर्प्स’ने दिली. अफगाणी लष्कराने या जिल्ह्यातून तालिबानी दहशतवाद्यांना पिटाळून लावले. असाच प्रयत्न तालिबानने हेरात प्रांतातही करुन पाहिला होता. त्या ठिकाणी अफगाणी सुरक्षा दलाने तालिबानला जोरदार प्रत्युत्तर दिले.
अमेरिका आणि तालिबानमध्ये झालेल्या शांतीकरारानुसार, अफगाणी सरकारने तुरुंगात असलेल्या शेकडो तालिबानी कैद्यांना सोडले आहे. यामुळे अफगाणिस्तानात शांतता नांदेल, असा विश्वास अफगाणी सरकारने व्यक्त केला आहे. पण यानंतर तालिबानचे अफगाणिस्तानातील हल्ले वाढले आहेत. तुरुंगातून बाहेर आलेले तालिबानचे दहशतवादी अफगाणिस्तानमधील संघर्षात पुन्हा उतरतील आणि लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या अफगाण सरकारवर हल्ले चढवतील, असा इशारा ‘फॉरेन पॉलिसी’च्या अहवलामधून देण्यात आला होता. इतकेच नाही तर हे तालिबानी अफगाणिस्तानचे लोकनियुक्त सरकार उलथून टाकतील, असा इशारा या अहवालातून देण्यात आला. याआधीही तुरुंगातून सुटलेल्या तालिबानी कैद्यांनी अफगाणिस्तानात रक्तपात घडविल्याची उदाहरणे आहेत.
दरम्यान, कतारच्या दोहामध्ये अफगाणी सरकार आणि तालिबानमध्ये शांतीचर्चा पार पडणार आहे. त्यासाठी तालिबानी शिष्टमंडळ कतारमध्ये दाखल झाले. पण अफगाणिस्तानच्या सरकारमध्ये या शांतीचर्चेविषयी मतभेत आहे. ही चर्चा सुरू होणाच्या आधीच तालिबानने अफगाणिस्तानात रक्तपात सुरु करुन आपण हिंसेचा मार्ग सोडणार नसल्याचे बजावले आहे.