वॉशिंग्टन – रशियन इंधनवायूच्या आयातीवर बंदी घालणाऱ्या युरोपला आपण इंधनाचा मुबलक पुरवठा करू, असे आश्वासन अमेरिकेने दिले होते. मात्र अमेरिकी कंपन्या युरोपची इंधनाची वाढती मागणी पूर्ण करण्यात अपयशी ठरत असल्याचे अहवाल गेल्या काही दिवसांमध्ये समोर आले होते. या पार्श्वभूमीवर युरोपला इंधनवायूचा पुरवठा करणाऱ्या अमेरिकेतच गॅसची टंचाई भासू शकते, असा दावा आघाडीच्या वृत्तसंस्थेने केला. ‘नॉर्ड स्ट्रीम’ इंधनवाहिनीतील गळती व त्यामुळे युरोपातील इंधनदरांच्या भडक्याचे वृत्त समोर येत असतानाच हा दावा लक्ष वेधून घेणारा ठरला आहे.
काही दिवसांपूर्वीच, ब्रिटनमधील आघाडीचे दैनिक ‘द फायनान्शिअल टाईम्स’ने अमेरिकेतील इंधन उत्पादकांनी युरोपच्या गरजा पूर्ण करण्याबाबत असमर्थता दर्शविल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यापाठोपाठ आता ‘रॉयटर्स’ या आघाडीच्या वृत्तसंस्थेने अमेरिकेतील कंपन्या अमेरिकेचीच वाढती गरज पूर्ण करण्यासाठी सक्षम नसल्याचा अहवाल दिला आहे. अमेरिकेत असलेला इंधनवायूचा साठा (वकिग इन्व्हेंटरिज् इन अंडरग्राऊंड स्टोरेज) २,७७१ अब्ज घनफूटांपर्यंत खाली आला आहे. ही२०१० सालानंतरची दुसरी नीचांकी पातळी आहे. कोरोनापूर्वी अमेरिकेकडे असणाऱ्या सरासरी साठ्याचा विचार करता हा साठा ४०० अब्ज घनफुटांनी कमी आहे.
अमेरिकेच्या काही भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती असल्याने जलविद्युत निर्मितीवर मर्यादा आल्या असून कोळशाचा वापर जवळपास बंद झाला आहे. त्यामुळे वीजनिर्मितीसाठी इंधनवायूचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अमेरिकेतील वीजनिर्मिती कंपन्यांनी यावर्षी पहिल्या पाच महिन्यातच ४,३७२ अब्ज घनफूट इंधनवायूचा वापर केला आहे. हिवाळ्यात ही मागणी अधिक प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. हिवाळ्यातील सरासरी मागणी दीड ते तीन हजार अब्ज घनफूट असली तरी चक्रीवादळ व इतर आपत्तींचा विचार करता त्यात मोठी भर पडू शकते.
दुसऱ्या बाजूला युरोप व आशियाई देशांमधून मागणी वाढल्याने अमेरिकी कंपन्या निर्यातीवर अधिक भर देत आहेत. मात्र अमेरिकेतील एकूण इंधनवायू उत्पादनात यावर्षी फक्त चार टक्क्यांची भर पडली आहे. ही बाब लक्षात घेता हिवाळ्याच्या काळात अमेरिकी जनतेला अनपेक्षित टंचाईला तोंड द्यावे लागू शकते, अशी भीती वृत्तसंस्थेने व्यक्त केली आहे.