‘रॉ’प्रमुखांच्या भेटीनंतर नेपाळच्या पंतप्रधानांचा सूर बदलला

काठमांडू – नेपाळचे पंतप्रधान के.पी.शर्मा ओली यांनी देशवासियांना विजयादशमीच्या शुभेच्छा देताना जुना नकाशा वापरला. या नकाशात कालापानी, लिपुलेक भारताचा भाग आहेत. नेपाळच्या विरोधीपक्षांनी यावर आश्चर्य व्यक्त केले. भारताच्या गुप्तचर संघटना ‘रिसर्च अँड अॅनॉलिसिस विंग’चे (रॉ) प्रमुख सामंत गोयल यांच्या नेपाळ भेटीचा हा परिणाम असल्याचे सांगितले जाते. याद्वारे नेपाळी पंप्रधानांनी चीनला संदेश दिल्याचे दावे केले जात आहेत.

'रॉ'

मे महिन्यात नेपाळने उत्तराखंडमधील कालापानी, लिम्पियाधुरा आणि लिपुलेक नेपाळमध्ये दाखवून नेपाळचा नवा राजकीय नकाशा प्रसिद्ध केला होता. नेपाळच्या संसदेनेही हा नकाशा मंजूर केला होता. त्यामुळे नेपाळच्या पंतप्रधानांनी विजयादशमीच्या शुभेच्छा देताना नवा नकाशा वापरायला हवा होता, असे नेपाळच्या विरोधी पक्षांचे म्हणणे होते. पण नेपाळच्या पंतप्रधानांनी जुना नकाशा वापरुन भारताबरोबरील संबंध पूर्ववत करण्याला भर दिला आहे.

पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारताचे लष्करप्रमुख जनरल मनोज मुंकूद नरवणे नेपाळ भेटीवर जाणार आहेत. त्याआधी ‘रॉ’चे प्रमुख गोयल यांनी नेपाळला भेट दिली. ‘रॉ’प्रमुखांनी पंतप्रधान ओली आणि नेपाळी कम्युनिस्ट पक्षाचे प्रमुख नेते माजी पंतप्रधान प्रचंड यांचीही भेट घेतल्याची चर्चा आहे. या भेटीचे तपशील प्रसिद्ध झालेले नाही. पण या भेटीमुळेच नेपाळच्या भूमिकेत बदल झाल्याचे पहायला मिळत आहे.

जुना नकाशा वापरल्यामुळे पंतप्रधान के.पी.शर्मा ओली यांच्यावर टीका होत आहे. हा वाद वाढल्यानंतर नेपाळच्या पंतप्रधानांचे सल्लागार सूर्या थापा यांनी पंप्रधानांनी नवा नकाशाच वापरला होता. मात्र तो छोट्या स्वरूपात असल्याने या नकाशात कालापानी, लिपुलेक सारखे भाग स्पष्ट दिसून येत नाहीत. मात्र हा नकाशा मोठा करून पाहिल्यास हे भाग स्पष्ट दिसून येतात, असे स्पष्टीकरण थापा यांनी दिले. मात्र पंतप्रधान ओली यातून चीन आणि भारत दोघांनाही संदेश देत असल्याचे दावे केले जात आहेत.

गेल्या काही दिवसात नेपाळ सरकार भारताबरोबर प्रयत्न सामान्य करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. नेपाळने वादग्रस्त नकाशा असलेल्या पाठ्यपुस्तकावर बंदी घातली. तसेच नेपाळच्या सरकारने भारताशी द्विपक्षीय चर्चा करण्यासाठी पुढाकार घेतला. यामागे चीनने नेपाळच्या बळकावलेल्या भूमीची पार्श्वभूमी असल्याचे बोलले जाते. चीनने नेपाळची भूभाग बळकविल्यामुळे ओली सरकारवर टीका होत आहे. त्यामुळे जुना नकाशा वापरून नेपाळच्या पंतप्रधानांनी चीनला संदेश दिल्याचे बोलले जाते.

दरम्यान, नेपाळमध्ये चीनने बळकावलेल्या भूभागानंतर भारतीय गुप्तचर संस्थाही हाय अलर्टवर आहेत. चीन नेपाळमध्ये आपल्या विस्तारवादी धोरणानुसार भूभाग बळकावत असून नेपाळच्या माध्यमातून भारतावर लक्ष ठेवण्याचा चीनचा प्रयत्न आहे. नेपाळच्या सात जिल्ह्यातील मोठा भूभाग चीनने आपल्या कब्ज्यात घेतला आहे. डोखल जिल्ह्यातील अंतरराष्ट्रीय सीमा १५०० मीटर पुढे ढकलली आहे.

leave a reply