इस्लामाबाद – येत्या काही महिन्यात पाकिस्तानची अवस्था सध्याच्या श्रीलंकेसारखी होईल, या चिंतेने पाकिस्तानला ग्रासले आहे. पाकिस्तानवरील कर्जाचे ओझे प्रचंड प्रमाणात वाढलेले असताना देश चालविण्यासाठी चढ्या व्याजदराने नवे कर्ज घ्यावे लागत आहेत. घेतलेल्या नव्या कर्जातील बरीचशी रक्कम, आधी घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीसाठी वापरावी लागत आहे. त्यामुळे आपल्या देशाची अवस्था कदाचित श्रीलंकेपेक्षाही भयंकर होईल, असा दावा पाकिस्तानचीच माध्यमे करीत आहेत.
2020-21च्या संपूर्ण वित्तीय वर्षात पाकिस्तानने 13.38 अब्ज डॉलर्स इतके कर्ज घेतले होते. पण 2021-22च्या वित्तीय वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यातच पाकिस्तानला सुमारे 10.886 अब्ज डॉलर्स इतके कर्ज घ्यावे लागले. अशारितीने पाकिस्तानच्या कर्जात प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे. याचे कारण पाकिस्तानला आधी घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीसाठीच नव्या कर्जातील बरीचशी रक्कम खर्च करावी लागत आहे. तसेच या देशावरील कर्जाचा डोंगर पाहता, कर्जदार जोखमी वाढल्याचे सांगून पाकिस्तानला चढ्या व्याजाने कर्ज देत आहेत.
अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पाकिस्तानला फार मोठ्या अपेक्षा होत्या. नाणेनिधीकडे पाकिस्तानने तब्बल सहा अब्ज डॉलर्सच्या बेलआऊट पॅकेजची मागणी केली होती. पण नाणेनिधीने त्याला नकार दिला आहे. कारण पाकिस्तानने चीनकडून नक्की किती व कोणत्या व्याजाने आणि शर्तींवर कर्ज घेतले, याच माहिती उघड करण्याची सूचना नाणेनिधीने केली होती. याबरोबरच पाकिस्तानने आपला महसूल वाढविण्यासाठी संरक्षणखर्चात कपात करावी, वीज आणि इंधनाची दरवाढ करावी, अशा अटी नाणेनिधीने समोर ठेवल्याचे सांगितले जाते.
या अटी मान्य करण्यास पाकिस्तानचे सरकार तयार नाही. त्यामुळे पाकिस्तानने पुन्हा एकदा चीनकडे कर्जासाठी हात पसरल्याचे दिसत आहे. लवकरच पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहबाज शरीफ यासाठी चीनला भेट देणार असल्याचे सांगितले जाते. सध्या पाकिस्तानच्या परकीय गंगाजळीत 10 अब्ज डॉलर्सहून कमी निधी शिल्लक आहे. यातही दुसऱ्या देशांकडून घेतलेल्या कर्जाचा समावेश आहे. हे देश कुठल्याही क्षणी पाकिस्तानकडून हा निधी काढून घेऊ शकतात.
अशा परिस्थितीत एकाच वेळी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि चीनकडे हात पसरून पाकिस्तानचे सरकार देश वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. पण पाकिस्तानला यापुढे सहाय्य न करण्याचा कठोर निर्णय नाणेनिधीने घेतला आहे. त्यामुळे जागतिक बँक तसेच एशियन डेव्हलपमेंट बँकेने देखील पाकिस्तानचे अर्थसहाय्य थांबविले आहे. यामुळे अगतिक बनलेल्या पाकिस्तानचा चीन पुरेपूर लाभ उचलत असून व्याजाचे दर अधिकच वाढवून चीन पाकिस्तानला कर्ज देत आहे.
अशीच परिस्थिती कायम राहिली, तर देशाची मालमत्ता चीनला विकून पाकिस्तानला कर्जाची परतेफेड करावी लागेल. पाकिस्तानची माध्यमे याची कबुली देऊ लागली असून पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांवर आपल्या देशाची अवस्था श्रीलंकेहूनही भयंकर होईल, असे इशारे देण्यात येत आहेत. भारतासारखा शेजारी देश श्रीलंकेला अब्जावधी डॉलर्सचे अर्थसहाय्य करीत आहे. अफगाणिस्तानला हजारो मेट्रिक टन इतका गहू पुरवित आहे. पण पाकिस्तान एक अब्ज डॉलर्सच्या कर्जासाठी नाणेनिधीच्या तालावर नाचत आहे. तरीही नाणेनिधी पाकिस्तानला कर्ज द्यायला तयार नाही, अशी खंत या देशाचे अंतर्गत सुरक्षामंत्री राणा सनाउल्लाह यांनी व्यक्त केली.