नवी दिल्ली – लडाखमध्ये चीनबरोबर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय वायुसेनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक येत्या बुधवारी सुरू होत आहे. या बैठकीत लडाखमधील परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच पुढच्या आठवड्यात भारतात दाखल होणाऱ्या रफायल विमानांच्या तैनातीबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो. शत्रूची हवाई सुरक्षा यंत्रणा आणि रडारलाही गुंगारा देणाऱ्या या विमानांना लडाखमध्ये तैनात करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याआधीच भारताने लडाखमध्ये लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर्सचा मोठा ताफा तैनात केला आहे.
वायुसेनाप्रमुख आर. के. एस. भदोरिया यांच्या उपस्थितीत २२ आणि २३ जुलै असे दोन दिवस ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी लडाखमधील तणाव, वायुसेनेची सज्जता आणि भारतीय वायुसेनेत नव्याने दाखल होत असलेल्या रफायल विमानांना युद्धसज्ज ठेवण्याच्या मुद्द्यावर चर्चा होणार असल्याचे वायुसेनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. भारताने फ्रान्सबरोबर ३६ रफायल विमानांचा करार केला असून यातील चार लढाऊ विमाने ह्या महिन्याअखेरीस भारतात दाखल होणार होती. पण चीनबरोबर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारताने फ्रान्सकडे अतिरिक्त विमानांचा पुरवठा करण्याची मागणी केली होती. फ्रान्सने देखील भारताची ही मागणी मान्य केली असून येत्या सोमवारी अतिरिक्त विमानांसह रफायलचा ताफा भारतात दाखल होत आहे.
पुढच्या सोमवारी फ्रान्समधून दाखल होणारी ही विमाने पंजाबच्या अंबाला विमानतळावर उतरविण्यात येणार आहेत. या विमानांना शस्त्रसज्ज करण्यासाठी सदर विमानतळावर तयारी सुरू आहे. यातील काही विमानांना थेट लडाखमध्ये तैनात करण्याबाबत येत्या बुधवारी चर्चा होऊ शकते. लडाखमधील वायुसेनेची सज्जता वाढवण्यासाठी हा निर्णय घेतला जाऊ शकतो. असे झाल्यास, रफायल विमानांची ही तैनाती चीनसाठी सर्वात मोठा इशारा ठरू शकते. याआधीच भारताने लडाखमध्ये सुखोई-३० एमकेआय, मिग-२९ आणि मिराज २००० ह्या विमानांचा ताफा तैनात केला आहे. अशा परिस्थितीत सुखोई-३० एमकेआय आणि रफायल विमाने चीनसाठी मोठे आव्हान ठरू शकणार आहेत. त्यामुळे येत्या बुधवारी वायुसेनेच्या होणाऱ्या बैठकीकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्या आहेत.
दरम्यान, लडाखबाबत भारताच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नसून चीनने लष्करी बैठकीत झालेल्या निर्णयांचे पालन करावे, असे भारताकडून चीनला बजावले जात आहे.