वायुसेनेला लढाऊ विमानांची कमतरता भासू देणार नाही

-वायुसेनाप्रमुखांची ग्वाही

नवी दिल्ली – वायुसेनेच्या ताफ्यात काही दशकांपासून तैनात असलेली लढाऊ विमाने आता निवृत्तीच्या समीप आली आहेत. त्यांचा कार्यकाळ संपत असताना, वायुसेनेला लढाऊ विमानांची कमतरता भासेल, अशी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. पण वायुसेनेच्या ताफ्यातील लढाऊ विमानांच्या स्क्वाड्रनची संख्या 31च्या खाली येऊ देणार नाही, अशी ग्वाही वायुसेनाप्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांनी दिली आहे. लडाखच्या एलएसीजवळील क्षेत्रात चीनने आपल्या हवाई दलाची तैनाती वाढविल्याच्या बातम्या येत असताना, वायुसेनाप्रमुखांनी दिलेली ही ग्वाही महत्त्वाची ठरते.

लडाखच्या एलएसीजवळील आपल्या हवाई दलाच्या तैनातीत मोठी वाढ केली आहे. इथे आधी तैनात असलेल्या विमानांच्या दुप्पट प्रमाणात चीनने नवी लढाऊ विमाने तैनात केली आहेत. तसेच इथल्या हवाई क्षेत्राजवळून चीनच्या विमानांनी उड्डाण केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. यामुळे आपल्या हवाई दलाची क्षमता वाढवून चीन या क्षेत्रात आपले वर्चस्व प्रस्थापित करू पाहत असल्याचे संकेत मिळत आहेत.

VR-Chaudharyया पार्श्वभूमीवर, वायुसेनाप्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांनी वायुसेनेच्या क्षमतेबाबत महत्त्वपूर्ण विधाने केलीआहेत. काही झाले तरी वायुसेनेच्या ताफ्यात असलेल्या लढाऊ विमानांच्या स्क्वाड्रनची संख्या 31च्या खाली येऊ देणार नाही, असे वायुसेनाप्रमुख म्हणाले. तसेच पुढच्या काळात वायुसेनेसाठी 114 लढाऊ विमानांची खरेदी केली जाईल, अशी माहिती वायुसेनाप्रमुखांनी दिली. यापैकी 96 विमाने ‘मेक इन इंडिया’च्या अंतर्गत देशातच तयार केली जातील. तर यातील 18 विमाने परदेशातून तयार होऊन येतील, असे वायुसेनाप्रमुख म्हणाले.

फ्रान्स व अमेरिकन कंपन्यांशी भारत यासंदर्भात चर्चा करीत असल्याचे सांगितले जाते. तंत्रज्ञानाचे हस्तांतरण व मेक इन इंडिया योजनेच्या अंतर्गत या विमानांची भारतात निर्मिती करण्याची ठाम भूमिका भारताने स्वीकारलेली आहे. सुरूवातीच्या काळात याला नकार देणाऱ्या कंपन्या आता भारताची ही मागणी मान्य करण्यास तयार झाल्याच्या बातम्या येत आहेत. यामध्ये अमेरिकेच्या बोईंग कंपनीचा समावेश असल्याची चर्चा देखील सुरू झालेली आहे. तर फ्रान्सची रफायल कंपनी या प्रक्रियेत आघाडीवर असल्याचे काहीजणांचे म्हणणे आहे.

वायुसेनेबरोबरच नौदलातील विमानवाहू युद्धनौकांसाठीही लढाऊ विमानांच्या खरेदीची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी फ्रान्सच्या रफायल कंपनीच्या विमानांची चाचणी करण्यात आली असून सध्या अमेरिकेच्या बोईंग कंपनीच्या विमानांच्या चाचण्या सुरू आहेत. वायुसेनेसाठी विमानांची खरेदी करीत असताना, भारतीय नौदलासाठी लागणाऱ्या विमानांच्या कंत्राटावरही जगातील आघाडीच्या कंपन्यांचे लक्ष वेधलेले आहे.

leave a reply