काबूल – ‘अल-कायदा’च्या भारतीय उपखंडातील गटाचा दुसऱ्या क्रमांकाचा नेता असलेल्या ‘अबु मोहसिन अल-मसरी’ला अफगाणिस्तानच्या स्पेशल फोर्सने ठार केले. अमेरिकेसाठी मोस्ट वॉटेन्ड असलेला अबु मोहसिन ‘अल-कायदा’ प्रमुख डॉ. आयमन अल जवाहिरीचा जवळचा साथीदार होता. सध्या अफगाणिस्तानात तालिबान आणि सुरक्षादलांमध्ये जबरदस्त संघर्ष पेटलेला असताना अबु मोहसिन मारला गेला आहे. दरम्यान कबूलमध्ये एका शैक्षणिक संस्थेला लक्ष करून झालेल्या आत्मघाती हल्ल्यातील बळींची संख्या ३० वर गेली आहे. यातील बहुतांश जण विद्यार्थी आहेत.
शनिवारी अफगाणिस्तानच्या गझनी प्रांतात स्पेशल फोर्सने ‘अल-कायदा’चा वरिष्ठ नेता ‘अबु मोहसिन अल-मसरी’ला ठार केले. ‘अबु मोहसिन’ इजिप्तचा नागरिक होता. अल कायदाच्या भारतीय उपखंडासाठीच्या गटाचे नेतृत्व त्याच्याकडे होते व तो या गटाचा क्रमांक दोनचा नेता होता. त्याला ‘अब्द-अल-रौफ’ या नावानेही ओळखले जात होते, अशी माहिती अफगाणिस्तानने दिली आहे. गझनी प्रांतात कारवाई दरम्यान अबु मोहसिन मारला गेल्याने अफगाणिस्तान आणि येथील जनतेविरोधात कारवाई करणाऱ्या दहशतवादी संघटनेचे आणि तालिबानचे संबंध अधोरेखित होतात, असे अफगाणिस्तानचे अंतर्गत सुरक्षामंत्री मसूद अंद्राबी यांनी म्हटले आहे.
अमेरिकेच्या नागरिकांच्या हत्येसाठी अबु मोहसिनला जबाबदार ठरवून २०१८ साली अमेरिकेने त्याच्याविरोधात अरेस्ट वॉरंट काढले होते. अमेरिकेसाठी तो ‘मोस्ट वॉटेंड’ दहशतवादी होता. ‘अल-कायदा’चा प्रमुख अल-जवाहिरीच्या तो जवळचा होता. अमेरिकेवर झालेल्या ९/११ हल्ल्याची त्याला पूर्वकल्पना होती, असे सांगण्यात येते. या मोहिमेची माहिती अफगाणी यंत्रणेने गुप्त ठेवली आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांनी यासाठी अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलाचे अभिनंदन केले.
दरम्यान, शनिवारी अफगाणिस्तानच्या काबूलमध्ये शैक्षणिक संस्थेला लक्ष्य करुन झालेल्या आत्मघाती हल्ल्यातील बळींची संख्या ३० वर पोहोचली आहे. ‘आयएस’ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. सुरुवातीला या हल्ल्याप्रकरणी तालिबानवर संशय व्यक्त केला जात होता. कारण याआधी अफगाणिस्तानमध्ये झालेल्या हल्ल्यात तालिबानचाच हात होता. कतारच्या दोहामध्ये अफगाणिस्तान आणि तालिबानमध्ये शांतीचर्चा सुरु झाल्यानंतर आणि अमेरिकेने अफगाणिस्तानातून सैन्यमाघारीचे संकेत दिल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे.