चीनकडून लॅटिन अमेरिकेवरील प्रभाव वाढविण्यासाठी महत्त्वाकांक्षी करार

- अणुतंत्रज्ञानासह अंतराळक्षेत्र व 5जीसाठी सहकार्य करणार

बीजिंग – अमेरिकेचे पारंपारिक प्रभावक्षेत्र म्हणून ओळखण्यात येणाऱ्या लॅटिन अमेरिकी खंडात आपला प्रभाव वाढविण्यासाठी चीनने आक्रमक हालचाली सुरू केल्या आहेत. गेल्या महिन्यात चीन व लॅटिन अमेरिकी देशांची संघटना असणाऱ्या ‘सेलॅक`मध्ये व्यापक करारावर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. या कराराच्या माध्यमातून चीन लॅटिन अमेरिकी देशांना अणुतंत्रज्ञानासह अंतराळक्षेत्र, 5जी तसेच संरक्षणविषयक सहकार्य पुरविणार असल्याचे समोर आले आहे. हा करार म्हणजे चीनकडून लॅटिन अमेरिकेला ‘टेक ओव्हर` करण्याचा डाव असल्याचा इशारा अमेरिकी विश्‍लेषकांनी दिला आहे.

चीनकडून लॅटिन अमेरिकेवरील प्रभाव वाढविण्यासाठी महत्त्वाकांक्षी करार - अणुतंत्रज्ञानासह अंतराळक्षेत्र व 5जीसाठी सहकार्य करणारगेल्या महिन्यात ‘चायना-सेलॅक फोरम`ची व्हर्च्युअल बैठक पार पडली. या बैठकीत, ‘जॉईंट ॲक्शन प्लॅन फॉर कोऑपरेशन इन कि एरिआज्‌(2022-2024)` करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या करारात चीनने लॅटिन अमेरिकी देशांबरोबर अणुऊर्जा, अंतराळ, 5जी, प्रगत तंत्रज्ञान, ग्रीन टेक व संरक्षणक्षेत्रात सहकार्य वाढविण्याची ग्वाही दिली आहे. लॅटिन अमेरिकी देशांमध्ये अणुप्रकल्प उभारण्यासह, 5जी तंत्रज्ञानाशी निगडित पायाभूत सुविधा, हरित ऊर्जा प्रकल्प आणि अंतराळक्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याची तयारी चीनने दर्शविली आहे.

चीनने आपल्या महत्त्वाकांक्षी ‘बेल्ट ॲण्ड रोड इनिशिएटिव्ह` अंतर्गत लॅटिन अमेरिकी देशांमध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. गेल्या 16 वर्षात चीनकडून लॅटिन अमेरिकी देशांना विविध क्षेत्रातील प्रकल्पांसाठी जवळपास 150 अब्ज डॉलर्सचे कर्ज दिल्याची माहिती समोर आली आहे. तर गेल्या दोन दशकात चीन व लॅटिन अमेरिकी देशांमधील व्यापार तब्बल 25 पटींनी वाढला आहे. 2000 साली चीन व लॅटिन अमेरिकी देशांमधील व्यापार 12 अब्ज होता, तर आता तो 315 अब्ज डॉलर्सपर्यंत जाउन पोहोचला आहे. बऱ्याच लॅटिन अमेरिकी देशांसाठी चीन हा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश बनला आहे. यापूर्वी हे स्थान अमेरिकेकडे होते.

लॅटिन अमेरिका खंड व कॅरेबियन बेटदेश हे अमेरिकेचे ‘बॅकयार्ड` म्हणून ओळखण्यात येते. 2000 सालानंतर अमेरिकी प्रशासनाने या क्षेत्राकडे काही प्रमाणात दुर्लक्ष केले होते. त्याचा फायदा चीनने उचलला असून बंदरांपासून ते अणुऊर्जा सहकार्यापर्यंत अनेक क्षेत्रात पाय रोवण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारकिर्दीत चीनला रोखण्याचे प्रयत्न सुरू झाले होते, पण नंतर आलेल्या बायडेन प्रशासनाने चीनच्या हालचाली अजूनही फारशा गांभीर्याने घेतल्या नसल्याचा दावा विश्‍लेषक करीत आहे.

लॅटिन अमेरिकेतील चीनचा वाढता वावर अमेरिकेच्या सुरक्षाविषयक हितसंबंधांना धोकादायक ठरु शकतो, असा इशारा अमेरिकेच्या परराष्ट्र विभागातील माजी अधिकारी इव्हान एलिस यांनी केला.

leave a reply