इंडो-पॅसिफिकच्या ‘बॉम्बर टास्क फोर्स’साठी अमेरिकन बी-52 बॉम्बर्स गुआममध्ये दाखल

बी-52बार्क्सडेल – प्रचंड प्रमाणात बॉम्ब्स्‌चा वर्षाव करण्याची क्षमता असलेली अमेरिकेची ‘बी-52 स्ट्रॅटोफोर्टेस’ बॉम्बर्स विमाने आणि 320 जवान पॅसिफिक महासागरातील गुआम बेटावर दाखल झाले. अमेरिकेच्या इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील ‘बॉम्बर टास्क फोर्स’ला सहाय्य म्हणून तैनाती केल्याचे अमेरिकेच्या हवाईदलाने म्हटले आहे. गुआम बेटावरील तैनातीनंतर अमेरिकेच्या बॉम्बर्स विमानांनी सलग दोन दिवस जपान व नंतर इंडोनेशियाच्या लढाऊ विमानांबरोबर पॅसिफिक क्षेत्रात हवाई सराव केल्याची माहिती हवाईदलाने दिली.

अमेरिकेच्या लुसियाना येथील दुसरे आणि 307वे ‘बॉम्ब विंग्स्‌’ युनिट गुआमसाठी रवाना केले. गेल्या महिन्यात 26 ऑगस्ट रोजीच बी-52 बॉम्बर्सचे पथक गुआमच्या अँडरसन हवाईतळावर दाखल झाले. अमेरिकेच्या ‘बॉम्बर टास्क फोर्स-बीटीएफ’अंतर्गत ही तैनाती केल्याचे बीटीएफचे प्रमुख लेफ्टनंट कर्नल बेंजामिन पुल यांनी स्पष्ट केले. याआधीच गुआम बेटावर अमेरिकेचे लांब पल्ल्याचे सुपरसनिक बी-1बी लान्सर तर बी-2ए स्पिरिट स्टेल्थ बॉम्बर्स तैनात आहेत.

या नव्या तैनातीबाबत लेफ्टनंट कर्नल बेंजामिन पुल यांनी माहिती दिली. ‘बीटीएफमुळे तत्परता वाढविण्याची संधी व जगभरातील कुठल्या संकटांना प्रतिसाद देण्यासाठी आवश्‍यक प्रशिक्षण मिळते’, असे लेफ्टनंट कर्नल बेंजामिन म्हणाले. तसेच ‘शत्रूला अमेरिकेचा अंदाज घेता येऊ नये, यासाठी या क्षेत्रातील आपल्या मित्र व सहकारी देशांबरोबर बीटीएफचा सराव आयोजित केला’, असे बेंजामिन यांनी स्पष्ट केले. गुआमवरील तैनातीनंतर अमेरिकेच्या बी-52 बॉम्बर्स विमानांनी मंगळवारी जपान तर बुधवारी इंडोनेशियाच्या अनुक्रमे एफ-16 आणि एफ-15 विमानांबरोबर सराव केला. पॅसिफिक क्षेत्रातील अज्ञात हद्दीत हा सराव पार पडल्याचे अमेरिकेच्या हवाईदलाने सांगितले. यापैकी इंडोनेशियाचे हवाईदल पहिल्यांदाच अमेरिकेच्या बॉम्बर विमानांबरोबर सराव करीत होते, असे अमेरिकेच्या हवाईदलाने म्हटले आहे. या दोन्ही बॉम्ब विंग्स्‌मधील किती विमाने गुआमसाठी रवाना केली, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. पण हवाईदलाच्या एका विंगमध्ये तीन स्क्वाड्रन असतात आणि एका स्क्वाड्रनमध्ये 18 ते 20 विमाने किंवा हेलिकॉप्टर्सचे पथक असते. त्यामुळे अमेरिकेने गुआमवरील बॉम्बर्स विमानांची संख्या वाढविली असावी, अशी शक्यता लष्करी विश्‍लेषक व्यक्त करीत आहेत.

बी-52 बॉम्बर्सची गुआमवरील तैनाती ठराविक काळाने बदलली जाते खरी. पण यंदाची ही तैनाती मोठी असल्याचा दावा केला जातो. त्यातही या क्षेत्रातील चीनच्या वाढत्या लष्करी हालचालींच्या पार्श्‍वभूमीवर, अमेरिकेच्या या बॉम्बर्स विमानांच्या तैनातीचे महत्त्व अधिकच वाढले आहे.

या आठवड्याच्या सुरुवातीला चीनने साऊथ चायना सी क्षेत्रातून प्रवास करणाऱ्या मालवाहू तसेच लष्करी जहाजांसाठी नवे नियम लागू केले. यावर अमेरिका, ऑस्ट्रेलिया या देशांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर पुढच्या दोन दिवसात इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील मित्र व सहकारी देशांबरोबर अमेरिकेच्या बॉम्बर्स विमानांनी केलेला सराव चीनला इशारा देणारा ठरतो.

दरम्यान, या बॉम्बर्स विमानांबरोबरच अमेरिकेच्या तटरक्षकदलाने पश्‍चिम पॅसिफिक क्षेत्रातील आपल्या जहाजांची तैनाती वाढविली आहे. चीनने ‘साऊथ चायना सी’ क्षेत्रासाठी नवे नियम लागू केल्यानंतर अमेरिकेच्या हवाई व सागरी हालचाली वाढल्या आहेत. तर अमेरिकेच्या अफगाणिस्तानातील सैन्यमाघारीनंतर चीनने इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील देशांना आपल्या विरोधात अमेरिकेवर विसंबून राहू नका, अशा धमक्या दिल्या होत्या. या धमक्यांच्या पाठोपाठ चीनने इंडो-पॅसिफिक क्षेत्रात आक्रमक कारवायांचे सत्र सुरू करून ‘साऊथ चायना सी’ क्षेत्रासाठी नवे नियम लागू केले होते.

leave a reply