तैवानच्या सागरी हद्दीतून अमेरिकन विनाशिकेची गस्त

- चीनची संतप्त प्रतिक्रिया

तैपेई/शंघाय – क्षेपणास्त्रभेदी यंत्रणेने सज्ज असलेली ‘युएसएस मस्टिन’ या विनाशिकेने शनिवारी तैवानच्या आखातातून गस्त घातली. स्वतंत्र आणि मुक्त इंडो-पॅसिफिक क्षेत्राच्या सुरक्षेसाठी अमेरिका वचनबद्ध आहे, हे दाखविण्यासाठी सदर गस्त घातल्याचे अमेरिकेच्या नौदलाने स्पष्ट केले. यानंतर चीनने आपली विनाशिका आणि लढाऊ विमाने अमेरिकी विनाशिकेच्या मागे रवाना केली होती. तसेच या सागरी क्षेत्रातील अमेरिकेच्या मोहिमा तैवानमधील चीनविरोधी गटांना चिथावण्यासाठी असल्याचा आरोप चीनच्या लष्कराने केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून ईस्ट चायना सी’च्या क्षेत्रात अमेरिका आणि जपानच्या नौदलाचा संयुक्त सराव सुरू होता. या सरावात ‘युएसएस मस्टिन’ आणि जपानची ‘जेएस सुझूत्सुकी’ या विनाशिकांनी सहभाग घेतला होता. जपानमध्ये तैनात असलेल्या अमेरिकेच्या सातव्या आरमाराच्या नेतृत्वात हा युद्धसराव पार पडला होता. सदर युद्धसरावानंतर ‘युएसएस मस्टिन’ शनिवारी तैवानच्या आखातात दाखल झाली. आंतरराष्ट्रीय नियमांच्या चौकटीत राहून आपल्या विनाशिकेने ही गस्त पूर्ण केल्याची माहिती अमेरिकेच्या नौदलाने दिली. तसेच यापुढेही आंतरराष्ट्रीय नियमांचा आदर करून अमेरिकेची हवाई व सागरी गस्त सुरू राहणार असल्याचे अमेरिकी नौदलाने स्पष्ट केले.

अमेरिकी विनाशिकेच्या या गस्तीवर चीनच्या लष्कराने टीका केली. सदर सागरी क्षेत्रात आपल्या विनाशिका रवाना करून अमेरिका तैवानचा मुद्दा पेटता ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. तैवानमधील चीनविरोधी गटांना चिथावणी देण्यासाठी अमेरिका या हालचाली करीत आहे. तसेच अमेरिकेच्या या कारवायांमुळे या क्षेत्रातील शांती आणि स्थैर्य धोक्यात सापडत आहे. तर तैवानचा प्यादा सारखा वापर करून अमेरिका या क्षेत्रातील स्वत:चे स्वार्थी हेतू साध्य करीत असल्याचा आरोप चीनच्या लष्कराने केला.

तैवान हा आपलाच भूभाग असल्याचा दावा चीन करीत आहे. तैवानचा ताबा मिळविण्यासाठी चीनने लष्करी कारवाईच्या धमक्याही दिल्या आहेत. चिनी आक्रमणाच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्‍वभूमीवर, अमेरिकेने तैवानला प्रगत शस्त्रास्त्रे पुरविण्याचे जाहीर केले आहे. अमेरिकेच्या सिनेटमध्ये तसा प्रस्ताव मंजूर झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तैवानबरोबरच्या लष्करी सहकार्याला महत्त्व दिले आहे. दरम्यान, तैवानच्या आखातातील अमेरिकेच्या नौदलाची ही १२वी गस्त आहे. महिन्याभरापूर्वी अमेरिकेच्या ‘इंडो-पॅसिफिक कमांड’च्या मिलिटरी इंटेलिजन्सचे प्रमुख रिअर अ‍ॅडमिरल स्टडमॅन यांनी तैवानला भेट दिली होती. तेव्हा अमेरिकेची प्रगत विनाशिका ‘युएसएस बॅरी’ने तैवानच्या आखातात गस्त घातली होती. अमेरिका आणि तैवानमधील या लष्करी सहकार्याने अस्वस्थ झालेल्या चीनने तैवानवरील दडपण वाढविण्यास सुरुवात केली होती. एका महिन्यातच चीनच्या लढाऊ आणि बॉम्बर विमानांनी तब्बल २६ वेळा तैवानच्या हद्दीत घुसखोरी केली होती.

leave a reply