वॉशिंग्टन – ‘इराणच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी इस्रायल आवश्यक ती पावले उचलेल, हे अगदी स्वाभाविक ठरते. त्याचवेळी इस्रायलचा विनाश हे इराणचे ध्येय आहे. त्यामुळे इराक किंवा सिरियामध्ये या दोन्ही देशांकडून परस्परांच्या हितसंबंधांवर क्षेपणास्त्र हल्ले सुरू झाले आहेत. ही बाब अमेरिकी जवानांची सुरक्षा धोक्यात आणत आहे’, असा इशारा अमेरिकेच्या सेंटकॉमचे प्रमुख जनरल केनिथ मॅकेन्झी यांनी दिला.
बायडेन प्रशासन इराणबरोबर अणुकरार करण्यासाठी आणि निर्बंधातून सवलत देण्याची तयारी करीत असले, तरी इराण हा आखाताच्या सुरक्षेला सर्वात मोठा धोका असल्याचे जनरल मॅकेन्झी यांनी अधोरेखित केले. अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय पेंटॅगॉन येथे पत्रकारांशी बोलताना जनरल मॅकेन्झी यांनी या धोक्यांबाबत माहिती दिली.
गेल्या रविवारी इराकच्या कुर्दिस्तान प्रांताची राजधानी इरबिलमध्ये १२ क्षेपणास्त्र हल्ले झाले. इराणने या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली, तसेच इस्रायलच्या छुप्या ठिकाणाला लक्ष्य करण्यासाठी हे हल्ले चढविले होते, असे इराणने जाहीर केले. जनरल मॅकेन्झी यांनी देखील इराणने अमेरिकेच्या उच्चायुक्तालयाला लक्ष्य करण्यासाठी हे हल्ले झाले नव्हते, असा खुलासा केला. पण या हल्ल्यांमुळे इराक तसेच सिरियामध्ये तैनात अमेरिकी जवानांच्या सुरक्षेला असलेला धोका वाढल्याचा इशारा जनरल मॅकेन्झी यांनी दिला.
आखातातील अमेरिकेच्या ‘सेंट्रल कमांड-सेंटकॉम’चे प्रमुख असलेल्या जनरल मॅकेन्झी यांनी इराणपासून असलेला धोका अधिक सुस्पष्टपणे मांडला. आखातामध्ये अमेरिकेसमोर मोठ्या समस्या आहेत, न सुटलेले प्रश्न फार मोठे प्रश्न आहेत. पण इराणपासून संभवणार्या धोक्याकडे सेंटकॉमचे सर्वाधिक लक्ष असते, असे जनरल मॅकेन्झी यांनी स्पष्ट केले. तसेच सेंटकॉमचे नवे प्रमुख जनरल एरिक कुरिला यांनी आपल्या कार्यकाळात या इराणच्या धोक्याला अमेरिकेने सर्वाधिक महत्त्व द्यावे, असा सल्ला सेंटकॉमचे मावळते प्रमुख असलेल्या जनरल मॅकेन्झी यांनी दिला.
‘गेल्या सहा महिन्यांमध्ये इराण व इराणसंलग्न दहशतवादी संघटनांनी इराकमधील अमेरिकेच्या जवानांवर तसेच लष्करी तळांवर हल्ले चढविले आहेत. हे हल्ले अमेरिकेच्या लष्कराने उधळले. पण या हल्ल्यांमध्ये अमेरिकी जवानाचा बळी गेला असता तर परिस्थिती अतिशय वेगळी असती’, याकडे जनरल मॅकेन्झी लक्ष वेधले. त्याचबरोबर इराणबरोबर सुरू असलेल्या अणुकराराच्या वाटाघाटींवरही जनरल मॅकेन्झी यांनी आपली भूमिका मांडली.
‘व्हिएन्ना येथे सुरू असलेल्या अणुकराराच्या वाटाघाटी बाधित न करता आखातातील अमेरिकेच्या हितसंबंधांवर हल्ले चढविता येऊ शकतात, असा विश्वास इराणच्या नेत्यांना वाटत आहे’, याकडे जनरल मॅकेन्झी यांनी लक्ष वेधले. इराणला अणुबॉम्बच्या निर्मितीपासून रोखण्यासाठी वाटाघाटी आवश्यक आहेत. पण इराणने त्याचा गैरफायदा घेऊ नये, असे जनरल मॅकेन्झी यांनी बजावले आहे.