सेऊल – गेल्या आठवड्यात अमेरिकेने दक्षिण कोरियामध्ये ‘एफ-35′ ही अतिप्रगत लढाऊ विमाने तैनात करण्याची घोषणा केली. दक्षिण कोरियन हवाईदलाला प्रशिक्षण देण्यासाठी ही तैनाती असल्याचे अमेरिकेने म्हटले होते. यामुळे खवळलेल्या उत्तर कोरियाने क्षेपणास्त्रे प्रक्षेपित केल्याचा दावा माध्यमे करीत आहेत. दरम्यान, दक्षिण कोरियाची क्षेपणास्त्रे आपल्या शत्रूला जोरदार धक्का देण्यासाठी सज्ज असल्याचा इशारा दक्षिण कोरियाच्या संरक्षणदलप्रमुखांनी दिला.
गेल्या सहा महिन्यांमध्ये उत्तर कोरियाने लघु, मध्यम तसेच दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची चाचणी घेण्याचा सपाटा लावला आहे. यामुळे कोरियन क्षेत्रात तणाव निर्माण झाला असून जपान व दक्षिण कोरियाचे लष्कर अलर्टवर आहे. उत्तर कोरियाच्या या क्षेपणास्त्र चाचण्यांच्या विरोधात गेल्या आठवड्यात अमेरिकेने मोठी घोषणा केली. यानुसार अमेरिकेच्या हवाईदलातील ‘एफ-35ए’ ही स्टेल्थ श्रेणीतील लढाऊ विमाने दक्षिण कोरियात तैनात होतील, असे अमेरिकेच्या माध्यमांनी म्हटले होते.
दक्षिण कोरियन राष्ट्राध्यक्ष युन सूक-येओल अमेरिकेबरोबरचे लष्करी सहाय्य वाढविण्यासाठी उत्सूक आहेत. त्याचबरोबर दक्षिण कोरियाच्या नव्या राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकेसह लष्करी सामर्थ्याचे प्रदर्शन वाढविण्याचा प्रस्ताव दिला होता. या पार्श्वभूमीवर, लवकरच अमेरिका व दक्षिण कोरियामध्ये लष्करी सराव आयोजित होणार आहे. याची पूर्वतयारी म्हणून अमेरिकेची सहा एफ-35 दक्षिण कोरियात दाखल होणार होती. अमेरिकेचे हवाईदल दक्षिण कोरियन वैमानिकांना या अतिप्रगत लढाऊ विमानांचे प्रशिक्षण देणार आहे. तर येत्या काळात दक्षिण कोरिया अमेरिकेकडून या विमानांच्या खरेदीसाठी प्रयत्न करील, अशी शक्यताही वर्तविण्यात येते.
अमेरिका व दक्षिण कोरियातील या वाढत्या लष्करी सहकार्यामुळे बिथरलेल्या उत्तर कोरियाने क्षेपणास्त्रे प्रक्षेपण केल्याचा दावा दक्षिण कोरियन माध्यमे करीत आहेत. रविवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास उत्तरत कोरियाने एकहून अधिक क्षेपणास्त्रांचे प्रक्षेपण केले. या क्षेपणास्त्रांच्या ‘ट्रॅजेक्ट्रीज्’ दक्षिण कोरियन लष्कराने शोधून काढल्या आहेत. याद्वारे उत्तर कोरिया दक्षिण कोरियासह अमेरिकेला इशारा देत असल्याचा दावा स्थानिक माध्यमे करीत आहेत. दक्षिण कोरियन लष्कराच्या सूत्रांचा हवाला स्थानिक माध्यमांनी ही बातमी प्रसिद्ध केली.
येत्या काही दिवसात उत्तर कोरिया अणुचाचणी घेणार असल्याचा दावा केला जातो. त्याआधी अमेरिका व दक्षिण कोरिया लष्करी हालचाली वाढविल्या आहेत. दक्षिण कोरियाचे संरक्षणदलप्रमुख जनरल किम स्युंग-क्यूम यांनी देखील सोमवारी उत्तर कोरियाला स्पष्ट शब्दात बजावले. उत्तर कोरियाच्या प्रक्षोभक कारवायांना उत्तर देण्यासाठी दक्षिण कोरियाची क्षेपणास्त्रे सज्ज असल्याचे जनरल क्यूम यांनी बजावले.
दरम्यान, अमेरिकेच्या अतिप्रगत स्टेल्थ विमानांची ही तैनाती उत्तर कोरियाच्या आव्हानाचा मुकाबला करण्यापेक्षाही चीनला इशारा देणारी असल्याचा दावा अमेरिकेतील काही विश्लेषक करीत आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील घडामोडी कोरियन शेजारी देशांपर्यंत मर्यादित राहिलेल्या नाहीत याकडे अमेरिकेतील विश्लेषक लक्ष वेधत आहेत.