बीजिंग – चीनमध्ये राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि कम्युनिस्ट पक्षाची हुकूमशाही नको तर जनमतावर निवडून येणारे लोकशाही सरकार हवे आहे, अशी मागणी करणारे मोठे बॅनर्स राजधानी बीजिंगमध्ये झळकले होते. जिनपिंग यांची सलग तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदासाठी नियुक्ती होण्याच्या दोन दिवस आधी झळकलेल्या या पोस्टर्सनी जगाचे लक्ष खेचून घेतले होते. चीनच्या राजवटीने ही पोस्टर्स हटवून येथे काही घडले नसल्याचा आव आणला होता. पण बीजिंगनंतर चीनच्या एकूण आठ शहरांमध्ये राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्याविरोधात निदर्शने पार पडल्याचा दावा अमेरिकेतील आघाडीच्या वर्तमानपत्राने केला आहे.
राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्या एकाधिकारशाहीविरोधात चीनमधील असंतोष उफाळून वर येत असल्याचे पाश्चिमात्य माध्यमांचे म्हणणे आहे. गेल्या काही महिन्यांपासून चीनमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिअंट सापडल्यानंतर जिनपिंग यांच्या राजवटीने आपल्या जनतेवर नव्याने झिरो कोविड पॉलिसी लादली आहे. गेल्या आठवड्यात राजधानी बीजिंगमधील ‘सिताँग फ्लायओव्हर’वर जिनपिंग यांच्या धोरणांना लक्ष्य करणारे आणि लोकशाहीची मागणी करणारे दोन बॅनर्स लागले होते. पेंग लिफा नामक नागरिकाने हे पोस्टर्स लावल्याचा दावा केला जातो.
मानवाधिकार पायदळी चिरडणाऱ्या आणि आपल्या निर्दयी कारवाईसाठी कुख्यात असलेल्या चीनच्या कम्युनिस्ट राजवटीविरोधात धारिष्ट्य दाखविणारा पेंग लिफा हा ‘ब्रिज मॅन’ किंवा ‘न्यू टँक मॅन’ म्हणून प्रसिद्ध झाला. 1989 साली बीजिंगमधील तियानमेन चौकात कम्युनिस्ट पक्षाच्या लष्कराच्या रणगाड्यासमोर उभे राहणारा निदर्शक टँक मॅन इतिहासात ओळखला जातो. त्यामुळे जिनपिंग राजवटीविरोधात बॅनर्स लावणाऱ्या ब्रिज मॅनच्या निमित्ताने आपल्याला नवा टँक मॅन सापडल्याची चर्चा चीनच्या सोशल मीडियामध्ये सुरू आहे.
बीजिंगच्या सिताँग फ्लायओव्हरवर लागलेल्या पोस्टर्सनी चीनमधील राजवटविरोधातील आवाजाला बळ मिळाल्याचा दावा अमेरिकेच्या आघाडीच्या वर्तमानपत्राने केला. बीजिंगनंतर चीनच्या एकूण आठ शहरांमध्ये राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्याविरोधात निदर्शने झाली. यामध्ये शांघाय, शेंझेन, गाँगझाऊ तसेच कम्युनिस्ट राजवटीने नियंत्रणाखाली आणलेल्या हाँगकाँगचा देखील समावेश आहे. चीनच्या कम्युनिस्ट राजवटीच्या विरोधात सोशल मीडियातून मोहीम राबवणाऱ्या चिनी नागरिकांच्या ऑनलाईन अकाऊंटमधून ही माहिती समोर आली आहे.
राजधानी बीजिंगमधील ‘चायना फिल्म अर्काईव्ह आर्ट सिनेमा’ येथील प्रसाधनगृहात तर काही शाळांमध्ये जिनपिंगविरोधी विधाने लिहिल्याची माहिती चिनी सोशल मीडियामध्ये फिरत आहे. सदर ठिकाणे कम्युनिस्ट राजवटीच्या सीसीटीव्हीपासून दूर असल्यामुळे अशा स्वरुपाची निदर्शने करण्यात आल्याचा दावा केला जातो. तर चीनव्यतिरिक्त अमेरिका, ब्रिटन तसेच युरोप आणि ऑस्ट्रेलियातील विद्यापीठांमध्ये देखील चीनच्या कम्युनिस्ट पक्ष आणि राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्या विरोधात बॅनर्स लागल्याचे फोटोग्राफ्स समोर आले आहेत. यातील ‘नो टू ग्रेट लिडर’ या बॅनरला चिनी निदर्शकांमध्ये विशेष प्रसिद्धी मिळाली आहे.