नवी दिल्ली – राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) महासंचालकपदी पंजाबचे डीजीपी दिनकर गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्यावर्षी पासून एनआयएचे महासंचालकपद रिक्त होते. या जागेवर तात्पुरत्या स्वरुपात अतिरिक्त कार्यभार हा सीआरपीएफचे महासंचालक कुलदिप सिंग यांच्याकडे सोपविण्यात आला होता. 2024 सालापर्यंत गुप्ता हे एनआयएचे महासंचालक राहणार आहेत.
देशात दहशतवादाशी निगडीत गुन्ह्यांचा तपास करणारी केंद्रीय संघटना म्हणून एनआयएची ओळख आहे. 2008 च्या मुंबई हल्ल्यानंतर दहशतवादासंबंधीत प्रकरणासाठी एनआयएची स्थापना करण्यात आली होती. सध्या एनआयए अनेक दहशतवादी घटनांचा तपास करीत आहे. यामध्ये जम्मू-काश्मीरमधील टेरर फंडिंग प्रकरणाचा, तसेच अमली पदार्थांच्या आडून होणाऱ्या दहशतवाद्यांच्या फंडिंगचा तपासही एनआयएकडे आहे.
गेल्यावर्षी मे महिन्यात एनआयएचे तत्कालीन महासंचालक वाय.सी.मोदी हे निवृत्त झाले होते. मात्र या जागी पूर्णवेळ महासंचालकाची नियुक्ती करण्यात आली नव्हती. सीआरपीएफच्या महासंचालकांना एनआयएचा अतिरिक्त कार्यभारत सोपविण्यात आला होता. मात्र आता या जागी दिनकर गुप्ता यांची नियुक्ती झाली आहे. दिनकर गुप्ता हे 1987च्या छत्तीसगड कॅडेटचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी याआधी अनेक पदे भूषविली आहेत. ते 2019 सालापासून पंजाबचे पोलीस महासंचालक होते. तर त्याआधी त्यांनी पंजाब पोलिसांच्या गुप्तहेर विभागाचे महासंचालक म्हणूनही काम पाहिले आहे. गुप्ता यांना 1992 आणि 1994 साली पोलीस शौर्यपदकही मिळाले आहे. आपल्या अतुलनिय सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदकानेही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
पाकिस्तान पंजाबमध्ये पुन्हा हिंसाचार भडकविण्याचा प्रयत्न करीत आहे. यासाठी खलिस्तानी दहशतवाद्यांना पाकिस्तान सहाय्य करीत असून गेल्या चार ते पाच वर्षात अशी कितीतरी मॉड्यूल पंजाब पोलिसांनी उद्ध्वस्त केली आहेत. या पार्श्वभूमीवर पंजाबच्या पोलीस महासंचालकांची एनआयएच्या महासंचालकपदी नियुक्ती महत्वाची ठरते.