संघर्षबंदी मोडणाऱ्या हौथींना अरब लीगच्या प्रमुखांचा इशारा

संघर्षबंदीकैरो – येमेनमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून लागू असलेल्या संघर्षबंदीतून हौथी बंडखोरांनी माघार केली. त्याचबरोबर येमेनमधील इंधनावर आपला अधिकार असल्याचे सांगून याची चोरी करणाऱ्या परदेशी कंपन्यांना लक्ष्य करण्याची धमकी हौथींनी दिली. पण संघर्षबंदी मोडणाऱ्या हौथींमुळे येमेनमध्ये अस्थैर्य पुन्हा परत येईल व याची हौथींना मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा अरब लीगचे प्रमुख अहमद अबौल-घैत यांनी दिला.

2014 सालापासून येमेनमध्ये गृहयुद्ध भडकले आहे. इराणचा पाठिंबा असलेल्या हौथी बंडखोरांनी येमेनमधील हादी यांचे सरकार उलथून राजधानी सनाचा ताबा घेतला आहे. गेल्या सात वर्षांपासून सौदी अरेबिया व अरब मित्रदेशांच्या लष्करी आघाडीने हौथींविरोधात पुकारलेल्या संघर्षात चार लाखांहून अधिक जणांचा बळी गेला. तर लाखो जण विस्थापित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर, एप्रिल महिन्यात संयुक्त राष्ट्रसंघाच्या मध्यस्थीने येमेनचे लष्कर आणि हौथींमध्ये संघर्षबंदी लागू करण्यात आली होती.

2 ऑक्टोबर रोजी ही संघर्षबंदी संपुष्टात आल्यानंतर राष्ट्रसंघाने हौथींना संघर्षबंदीचा कालावधी वाढविण्याचे आवाहन केले. पण हौथी बंडखोरांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. तसेच परदेशी हस्तक आणि त्यांच्या समर्थकांवरील हल्ले सुरू ठेवण्याची धमकी हौथींनी दिली. त्यानंतर अरब लीगच्या प्रमुखांनी हौथींना नव्या संघर्षाचा इशारा दिला. यामुळे येमेनमध्ये नव्याने गृहयुद्ध पेट घेण्याची शक्यता बळावली आहे.

leave a reply