२२ जवानांचा बळी गेल्यानंतर आर्मेनिया – अझरबैजानमध्ये संघर्षबंदी जाहीर

संघर्षबंदीयेरेवन – सीमेवरील तणावामुळे आर्मेनिया आणि अझरबैजानमध्ये पेटलेल्या संघर्षात २२ जवानांचा बळी गेला. यानंतर रशियाने तातडीने मध्यस्थी करून आर्मेनिया-अझरबैजानमध्ये संघर्षबंदी प्रस्थापित केली. यामुळे मध्य आशियातील शेजारी देशांमध्ये संघर्ष काही काळासाठी टळला आहे. पण अतिशय संवदेनशील बनलेल्या सीमेवरुन आर्मेनिया व अझरबैजानमध्ये पुन्हा एकदा संघर्ष पेटण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचा इशारा आंतरराष्ट्रीय विश्‍लेषक देत आहेत.

आर्मेनिया आणि अझरबैजानच्या लष्कराने एकमेकांवर घुसखोरी तसेच हल्ल्यांचा आरोप केला आहे. दोन दिवसांपूर्वी अझरबैजानच्या लष्कराने आपल्या हद्दीत घुसून जवानांचे अपहरण केले. त्याचबरोबर आपल्या सीमेवरील गावांवर तोफांचे हल्ले चढविल्याचा ठपका आर्मेनियन लष्कराने ठेवला. ‘या संघर्षात १५ जवान ठार झाले असून अझरबैजानच्या लष्कराने १३ जवानांचे अपहरण केले. तसेच २४ जवानांबरोबर संपर्क होऊ शकलेला नसून ते देखील बेपत्ता आहेत’, अशी चिंता आर्मेनिया व्यक्त करीत आहे.

तर आर्मेनियाच्या लष्कराने केलबजार-गेघारकूनीक आणि लाचिन-स्युनिक भागात रॉकेट्स व तोफांचे हल्ले चढविल्याचा दावा अझरबैजान करीत आहे. यामध्ये आपले सात जवान मारले गेले तर दोन जखमी झाल्याचा आरोप अझरबैजानने केला. पण काही वृत्तसंस्थांमध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, आर्मेनियन लष्कराच्या कारवाईत अझरबैजानचे किमान ७० जवान मारले गेले किंवा बेपत्ता झाले आहेत.

संघर्षबंदीआर्मेनिया किंवा अझरबैजानने या दाव्यांना पुष्टी दिलेली नाही. पण सीमेवरील या संघर्षानंतर आर्मेनियाने रशियाला मध्यस्थीचे आवाहन केले होते. त्यानंतर मंगळवारी उशीरा दोन्ही शेजारी देशांनी संघर्षबंदी जाहीर केली. आर्मेनिया व अझरबैजानने संघर्षबंदी टिकवून ठेवावी, असे आवाहन अमेरिका, ब्रिटन, इराण तसेच युरोपिय महासंघाने केले आहे. पण यामुळे वर्षभरापूर्वी आर्मेनिया व अझरबैजानमध्ये भडकलेल्या संघर्षाच्या आठवणी ताज्या झाल्या.

बरोबर वर्षभरापूर्वी आर्मेनिया व अझरबैजानमध्ये ४४ दिवसांचा संघर्ष पेटला होता. नागोर्नो-काराबाखवरील नियंत्रणावरुन भडकलेल्या या संघर्षात ६५०० हजारांहून अधिक जणांचा बळी गेल्याचा दावा केला जातो. अझरबैजानला या संघर्षात विजय मिळाला होता. आर्मेनियाविरोधातील या संघर्षात तुर्की तसेच पाकिस्तानने अझरबैजानला सहाय्य केल्याचा आरोप त्यावेळी झाला होता. रशियाच्या मध्यस्थीनंतरच हा संघर्ष थांबला होता.

पण अजूनही आर्मेनिया आणि अझरबैजानमधील सीमावादाचा प्रश्‍न धगधगत आहे. अझरबैजानचे लष्कर आपल्या सीमेत घुसखोरी करीत असल्याचा आरोप आर्मेनियाकडून सातत्याने केला जातो. आर्मेनियाप्रमाणे इराणने देखील अझरबैजानी लष्कराच्या अरेरावीवर याआधी टीका केली आहे. आर्मेनियासाठी जाणार्‍या आपल्या व्यापारी वाहनांची अझरबैजानच्या लष्कराकडून कोंडी केली जाते, असा ठपका इराणने काही आठवड्यांपूर्वीच ठेवला होता. यामुळे इराण आणि अझरबैजानमध्ये देखील तणाव निर्माण झाला होता.

leave a reply