नवी दिल्ली – लष्करासाठी ४,९६० ‘मिलान-२टी’ या अँटी-टँक गाईडेड मिसाईलची खरेदी केली जाणार आहे. यासाठी ‘डिफेन्स पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग’ने (डीपीएसयू) भारत डायनामिक लिमिटेडबरोबर ११८८ कोटी रुपयांचा करार केला. फ्रान्स बनावटीच्या या क्षेपणास्त्रांसाठी ‘डीपीएसयू’आणि भारत डायनामिकमध्ये झालेला करार ‘मेक इन इंडिया’ला चालना देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येतो. पुढील तीन वर्षात ही क्षेपणास्त्रे लष्कराला देण्यात येणार आहेत.
लष्कराचे आधुनिकीकरण आणि बळकटीकरणावर भर देण्यात येत आहे. लष्करासाठी ‘मिलान-२टी’ मिसाईलची खरेदी त्याचाच भाग आहे. ‘मिलान-२टी’ हे रणगाडाभेदी क्षेपणास्त्र जमिनीवरून अथवा एखाद्या वाहनावरून डागणे शक्य आहे. हे क्षेपणास्त्र सुमारे दोन किलोमीटर क्षेत्रातील आपले लक्ष्य भेदू शकते.
‘मिलन-२टी’ अँटी टँक गायडेड मिसाईल पोर्टेबल असून सेकंड जनरेशन या क्षेपणास्त्र आहे. रणगाड्यांबरोबर बंकर्सही नष्ट करण्याची क्षमता या क्षेपणास्त्रामध्ये आहे. हे क्षेपणास्त्राचे फ्रान्सच्या ‘एमबीडीए मिसाईल सिस्टम’ने दिलेल्या परवान्याअंतर्गत भारत डायनॅमिक्स लिमिटेकडून निर्मिती केली जाणार आहे.
१९९९ साली झालेल्या कारगिल युद्धावेळी पाकिस्तानी बंकर्स नष्ट करण्यासाठी ‘मिलान२ टी’ या क्षेपणास्त्राचा वापर करण्यात आला होता. डोंगराळ भागात पाकिस्तानने बंकर्स उभारले होते. ते नष्ट करण्यासाठी ही क्षेपणास्त्रे अत्यंत उपयुक्त ठरली होती. या पार्श्वभूमीवर या क्षेपणास्त्रांची खदेरी अत्यंत महत्त्वाची ठरते. तसेच देशाअंतर्गत या क्षेपणास्त्राची निर्मिती करण्यात येणार असल्याने ‘मेक इन इंडिया’ला चालना मिळेल.