बीजिंग – ‘साऊथ चायना सी’च्या क्षेत्रात चीनने उभारलेली कृत्रिम बेट आणि त्यावर केलेल्या सैन्यतैनातीमुळे या सागरी क्षेत्रात तणाव निर्माण झाला आहे. पण येत्या काळात युद्ध भडकले तर ही कृत्रिम बेटे चीनसाठीच दुखणी ठरतील. सदर कृत्रिम बेटे शत्रूच्या हल्ल्यांचे सहज टार्गेट असतील आणि लष्करी स्तरावर चीनला सहाय्यकही ठरणार नाहीत, असा इशारा ‘नेव्हल अँड मर्चंट शिप्स’ या चीनमधील लष्करी मासिकाने दिला. चीनच्या वायुसेनेतील अत्याधुनिक मानली जाणारी ‘जे-16’ लढाऊ विमाने देखील या बेटांवर तैनात केली जाऊ शकत नाहीत, याची जाणीव या लष्करी मासिकाने करुन दिली.
गेल्या काही वर्षांपासून चीनने ‘साऊथ चायना सी’च्या सागरी क्षेत्रात भराव घालून मोठ्या संख्येने कृत्रिम बेटांची निर्मिती केल्याचा दावा केला जातो. स्प्रार्टले, पॅरासेलच्या क्षेत्रात उभारलेली सदर बेटे आपल्या सार्वभौमत्वाला आव्हान असल्याचा आरोप व्हिएतनाम, फिलिपाईन्स या देशांनी केला आहे. तर या कृत्रिम बेटांचे लष्करीकरण करून चीन या सागरी क्षेत्रावर अधिकार गाजविण्याचा प्रयत्न करीत आहे. यामुळे ‘साऊथ चायना सी’च्या क्षेत्रातून प्रवास करणाऱ्या परदेशी जहाजांची सुरक्षा धोक्यात आल्याचा आरोप अमेरिका व मित्रदेश करीत आहेत. येथील वुडी आयलँड, फेरी रिफ, स्कारबोरो द्विपसमुहावर धावपट्टी, रडार यंत्रणा, विमानभेदी तोफा व क्षेपणास्त्रे तैनात केल्याचे फोटोग्राफ्स याआधी अमेरिकी अभ्यासगटाने प्रसिद्ध केले होते. पण चीनच्या ‘पिपल्स लिबरेशन आर्मी’शी संबंधित असलेल्या ‘चायना स्टेट शिपबिल्डिंग कॉर्पोरेशन’ कंपनीच्या लष्करी मासिकामध्ये हीच कृत्रिम बेटे पुढच्या काळात चीनची कमजोरी ठरतील, असे बजावले आहे. यासाठी चिनी मासिकाने चार मुद्दे उपस्थित केले आहेत.
सदर कृत्रिम बेटे चीनच्या मुख्य भूमीपासून दूर ‘साऊथ चायना सी’मध्ये आहेत. चीनच्या हैनान प्रांतापासून एक हजार किलोमीटर अंतरावर असलेल्या ‘फेरी क्रॉस रिफ’ या बेटावर धावपट्टी आहे. त्यामुळे या बेटावर हल्ला झाला तर तिथपर्यंत सागरीमार्गे मदत पोहोचविण्यासाठी किमान 20 तासांचा अवधी लागू शकतो, असा दावा सदर मासिकाने केला. सदर बेट लांब अंतरावर असल्यामुळे या बेटांच्या सुरक्षेसाठी जे-16 लढाऊ विमाने रवाना केली तर मधल्या पट्ट्यात गस्त घालणाऱ्या शत्रूच्या युद्धनौका विमानभेदी तोफांनी चिनी विमानांवर हल्ला चढविता येऊ शकतो, याकडे चिनी मासिकाने लक्ष वेधले.
त्याचबरोबर चीनची सर्व कृत्रिम बेटे मोकळी व सपाट आहेत. यांना पर्वत किंवा डोंगरांचा नैसर्गिक आडोसा मिळालेला नाही. त्यामुळे सदर बेटे युद्धनौकांवरुन केल्या जाणाऱ्या हल्ल्यांचे थेट लक्ष्य ठरू शकतात. त्याचबरोबर या बेटांवर विमानांच्या सुरक्षेसाठी हँगर नसल्याची आठवण लष्करी मासिकाने करुन दिली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नैसर्गिक आपत्ती अर्थात त्सुनामी, भरती आणि उष्णकटिबंधीय हवामानापासून या कृत्रिम बेटांचे नुकसान होऊ शकते, असा दावा या मासिकाने केला.
अशा परिस्थितीत, येत्या काळात ‘साऊथ चायना सी’मधील या कृत्रिम बेटांवर हल्ले झाले तर या बेटांच्या सुरक्षेसाठी धाव घेणे चीनला अवघड जाईल. त्यामुळे या बेटांची निर्मिती व त्यांचे लष्करीकरण करुनही युद्धकाळात चीन यांचा फार मोठा वापर करू शकणार नसल्याचा इशारा सदर मासिकाने दिला.