येमेनमधील चेंगराचेंगरीत किमान ८५ जणांचा बळी

सना – येमेनची राजधानी सनामध्ये आयोजित एका कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीत किमान ८५ जणांचा बळी गेला. यामध्ये महिला आणि मुलांचा मोठा समावेश आहे. या अपघातासाठी हौथी बंडखोर जबाबदार असल्याचा आरोप होत आहे. हौथी बंडखोरांनी हवेत केलेल्या गोळीबारानंतर येथील इलेक्ट्रिक केबल्सचे नुकसान होऊन मोठा स्फोट झाला व यात नागरिकांचा बळी गेल्याची टीका होत आहे.

yemen stampedeइस्लामधर्मियांच्या पवित्र सणाच्या निमित्ताने राजधानी सनामधील स्थानिक व्यापाऱ्याने गोरगरिबांना अन्न व कपड्यांसाठी १० डॉलर्स देण्याची घोषणा केली होती. सनातील शाळेमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती. उपासमारीमुळे त्रस्त असलेल्या येमेनी जनतेने हे सहाय्य मिळविण्यासाठी दूरवरच्या शहर-गावातूनही राजधानी सना गाठली होती.

पण हा जमाव आवरण्यासाठी तैनात हौथी बंडखोरांनी हवेत गोळीबार केल्यानंतर खांबांवर टांगलेल्या केबल्सचा स्फोट झाला. यामुळे घाबरलेल्या नागरिकांमध्ये पळापळ सुरू झाली व या चेंगराचेंगरीत ८५ जणांचा बळी गेला तर शंभरहून अधिक जण जखमी झाले. हौथी बंडखोरांनी आपल्यावरील हे आरोप फेटाळले आहेत. तसेच अपघाताचे ठिकाण असलेली शाळा बंद करून पत्रकारांना जाण्यासही हौथींनी मनाई केली आहे.

leave a reply