कॅनबेरा – ऑस्ट्रेलियाच्या संसदेने गुरुवारी गुगल व फेसबुकच्या एकाधिकारशाहीवर नियंत्रण ठेवणार्या कायद्याला मंजुरी दिली आहे. माहिती तंत्रज्ञान व सोशल मीडिया क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांविरोधात अशा रितीने कायदा करणारा ऑस्ट्रेलिया हा जगातील पहिलाच देश ठरला आहे. ‘न्यूज मीडिया बार्गेनिंग कोड’ नावाच्या या कायद्यानुसार, गुगल व फेसबुक या कंपन्यांना त्यांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येणार्या बातम्यांसाठी संबंधित दैनिके तसेच प्रसारमाध्यम कंपन्यांना मोबदला द्यावा लागणार आहे.
गेल्या काही वर्षात ‘गुगल’ व ‘फेसबुक’वर प्रसिद्ध होणार्या बातम्यांमुळे वृत्तपत्र उद्योगाला मोठा फटका बसल्याचे समोर आले आहे. इंटरनेट आवृत्ती प्रसिद्ध करणार्या वृत्तपत्रांनाही जाहिराती व त्यातून मिळणार्या उत्पन्नाचा फारसा फायदा होत नसल्याचे उघड झाले होते. एकट्या ऑस्ट्रेलियात इंटरनेटवर प्रसिद्ध होणार्या जाहिरातींमधील ७५ टक्के वाटा गुगल व फेसबुकला मिळत असल्याचे दिसून आले होते. मात्र इतक्या मोठा हिस्सा मिळविणार्या या कंपन्या माध्यमांना त्यातील वाटा देण्यास तयार नव्हत्या.
ऑस्ट्रेलियातील नव्या कायद्यामुळे गुगल व फेसबुकला वृत्तपत्रे व माध्यम कंपन्यांबरोबर करार करावे लागणार आहेत. करारावरून वाद निर्माण झाल्यास त्यावर तोडगा काढण्यासाठी स्वतंत्र यंत्रणाही उभारण्यात आली आहे. त्यामुळे गुगल व फेसबुकसारख्या कंपन्यांना वृत्तपत्रांवर एकतर्फी दबाव टाकता येणार नाही, अशी माहिती ऑस्ट्रेलियन सूत्रांनी दिली आहे.