ऑस्ट्रेलियाने जेरूसलेमचा राजधानीचा दर्जा मागे घेतला

- इस्रायलने ऑस्ट्रेलियन राजदूताला समन्स बजावले

दर्जा मागे घेतलाकॅनबेरा/जेरूसलेम – ‘इस्रायल हा ऑस्ट्रेलियाचा मित्रदेश आहे. पण 2018 साली जेरूसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देण्याबाबत ऑस्ट्रेलियाच्या तत्कालिन सरकारने घेतलेला निर्णय खेदजनक व आखाताची सुरक्षा धोक्यात टाकणारा होता’, असे सांगून ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्री पेनी वाँग यांनी जेरूसलेमला दिलेला राजधानीचा दर्जा मागे घेतला. यावर संतापलेल्या इस्रायलने ऑस्ट्रेलियाच्या राजदूताला समन्स बजावले. काही दिवसांपूर्वी ब्रिटनने देखील जेरूसलेमचा राजधानीचा दर्जा काढून घेण्यावर विचार करीत असल्याचे म्हटले होते.

चार वर्षांपूर्वी अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जेरूसलेम ही इस्रायलची राजधानी असल्याचे जाहीर केले. त्यापाठोपाठ ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, होंडूरास, ग्वातेमाला आणि कोसोवो या देशांनी देखील अमेरिकेच्या निर्णयाचे अनुकरण केले होते. ऑस्ट्रेलियाचे तत्कालिन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी त्यावेळी घेतलेल्या निर्णयावर सध्याचे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्या सरकारने ताशेरे ओढले आहेत. ‘ऑस्ट्रेलिया आजही द्विराष्ट्राच्या भूमिकेवर ठाम असून इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या नेत्यांनी वाटाघाटीतून जेरूसलेमचा मुद्दा निकालात काढावा, असे आजही ऑस्ट्रेलियाला वाटत आहे’, अशी घोषणा परराष्ट्रमंत्री वाँग यांनी केली.

इस्रायलचे पंतप्रधान येर लॅपिड यांनी ऑस्ट्रेलियाच्या या घोषणेवर ताशेरे ओढले. जेरूसलेम ही इस्रायलची कायमस्वरुपी राजधानी असून ऑस्ट्रेलियाच्या निर्णयाने त्यात फरक पडणार नाही, असे लॅपिड म्हणाले. तर ऑस्ट्रेलियातील ज्यूवंशियांच्या संघटनेने अल्बानीज सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे.

leave a reply