कॅनबेरा/बीजिंग – गेल्या महिन्यात चीनने सॉलोमन आईसलँडशी लष्करी तळाबाबतचा करार करून ऑस्ट्रेलियासह न्यूझीलंडची झोप उडविली होती. चीनने लष्करी तळ उभे केले, तर या क्षेत्रात अस्थैर्य माजेल, याची जाणीव झालेल्या ऑस्ट्रेलियाने तातडीने सॉलोमन आईसलँडला याची जाणीव करून देण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. ‘चीनबरोबरचा लष्करी करार नाकारून सॉलोमन आईसलँडने पॅसिफिक क्षेत्राच्या पारदर्शी कुटुंबाचा सदस्य म्हणून रहावे’, असे आवाहन ऑस्ट्रेलियाच्या वरिष्ठ मंत्र्यांनी सॉलोमन आईसलँडच्या दौर्यात केले.
ऑस्ट्रेलियाच्या आंतरराष्ट्रीय आणि पॅसिफिक व्यवहार विभागाचे मंत्री झेड सेसेला यांनी बुधवारी सॉलोमन आईसलँडचा दौरा करून पंतप्रधान मनासेह सोगावारे यांची भेट घेतली. ऑस्ट्रेलिया आणि सॉलोमनमधील सहकार्याची आठवण सेसेला यांनी यावेळी करून दिली. यावर्षीच ऑस्ट्रेलियाने सॉलोमन आईसलँडला जवळपास १२ कोटी डॉलर्सचे सहाय्य पुरविले होते, याकडे सेसेला यांनी लक्ष वेधले.
ऑस्ट्रेलिया हा सॉलोमन आईसलँडचा सुरक्षेच्या आघाडीवरील महत्त्वाचा सहकारी देश असल्याचे सेसेला यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. तसेच सॉलोमन आईसलँडचा वापर ऑस्ट्रेलियाविरोधात होणार नाही, या पंतप्रधान सोगावारे यांनी दिलेल्या वचनांची आठवण सेसेला यांनी करून दिली.
ऑस्ट्रेलियन मंत्र्यांनी सॉलोमन आईसलँडला दिलेल्या या भेटीचे अमेरिकेने स्वागत केले. तसेच सॉलोमन आईसलँडने आपल्या देशाचा वापर चीनच्या लष्करी तळासारखा होऊ देऊ नये, असे आवाहन अमेरिकेने केले आहे. या लष्करी कराराद्वारे चीन सॉलोमन आईसलँडचा मालक बनेल, असा इशारा अमेरिकेने दिला.
तर ऑस्ट्रेलियन मंत्र्यांनी सॉलोमन आईसलँडला दिलेल्या भेटीवर चीनची तीव्र प्रतिक्रिया आली आहे. ऑस्ट्रेलियाने चीन व सॉलोमन आईसलँडमधील सहकार्याचा आदर करावा आणि त्यात लुडबूड करू नये, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिआन यांनी बजावले.
सॉलोमन आईसलँडप्रमाणे चीनने ऑस्ट्रेलिया शेजारच्या ईस्ट तिमोर आणि पापुआ न्यू गिनी या देशांमध्ये देखील आपल्या हालचाली वाढविल्या आहेत. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या या वाढत्या हालचालींमुळे इथले स्थैर्य व सुरक्षा धोक्यात येत असल्याचा आरोप ऑस्ट्रेलिया करीत आहे.