मुंबई – ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी भारताची विमानवाहू युद्धनौका ‘आयएनएस विक्रांत’ला भेट दिली. यावेळी नौदलप्रमुख ॲडमिरल आर. हरि कुमार उपस्थित होते. पंतप्रधान अल्बानीज यांनी भारताचे स्वदेशी बनावटीचे लढाऊ विमान ‘तेजस’ची देखील पाहणी केली. ऑस्ट्रेलियाकडून आयोजित केल्या जाणाऱ्या ‘टॅलिस्मान सॅबर’ या बहुपक्षीय युद्धसरावात भारत पहिल्यांदाच सहभागी होणार असल्याचे पंतप्रधान अल्बानीज यांनी यावेळी घोषित केले. भारताच्या विमानवाहू युद्धनौकेला ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी दिलेली ही भेट चीनला विशेष संदेश देणारी असल्याचे दिसत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व पंतप्रधान अल्बानीज शुक्रवारी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, दुर्मीळ खनिज क्षेत्रातील सहकार्याबरोबरच संरक्षणाच्या आघाडीवरील सहकार्याला विशेष महत्त्व दिले जाईल. तसेच इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या वर्चस्ववादी कारवायांमुळे निर्माण झालेल्या असमतोलाचा मुद्दा देखील दोन्ही देशांच्या पंतप्रधानांमधील चर्चेत असेल, असे दावे केले जातात. तसेच चीनपासून इंडो-पॅसिफिक क्षेत्राला संभवणारा धोका लक्षात घेता, संरक्षणविषयक सहकार्य अधिकच भक्कम करण्याचा निर्णय उभय देशांचे पंतप्रधान घेणार असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
अशा परिस्थितीत भारताच्या स्वदेशी बनावटीच्या विमानवाहू युद्धनौकेला ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी दिलेली भेट लक्षणीय ठरते. यातून भारत व ऑस्ट्रेलियामध्ये विकसित होत असलेल्या धोरणात्मक पातळीवरील सहकार्याची जाणीव चीनला करून दिली जात आहे. आजवरच्या इतिहासात कधीही नव्हती, इतक्या प्रमाणात भारत व ऑस्ट्रेलियामधील भागीदारी आत्ताच्या काळात भक्कम झालेली आहे, असे सांगून पंतप्रधान अल्बानीज यांनी याचे स्वागत केले. दोन्ही देशांच्या संबंधांसाठी २०२३ हे वर्ष अधिकच महत्त्वाचे ठरेल, असा दावाही यावेळी ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी केला.
मुंबईमध्ये पंतप्रधान अल्बानीज यांनी इंडिया ऑस्ट्रेलिया सीईओ फोरमला देखील संबोधित केले. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान भारताच्या भेटीवर असताना, भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग व ऑस्ट्रेलियाचे संरक्षणमंत्री रिचर्ड मार्लेस यांची फोनवरून चर्चा पार पडली. दोन्ही देशांचे संरक्षणविषयक संबंध अधिकच दृढ करण्यावर या चर्चेत एकमत झाले. तसेच दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी विकसित करण्यासाठी वेगाने पावले उचलण्याचा निर्धार संरक्षणमंत्री राजनाथ सिंग व संरक्षणमंत्री रिचर्ड मार्लेस यांनी केला आहे. ‘टॅलिस्मान सॅबर’ या बहुपक्षीय युद्धसरावात भारत पहिल्यांदाच सहभागी होणार असल्याची घोषणा पंतप्रधान अल्बानीज यांनी केली. तसेच ऑस्ट्रेलिया या वर्षाच्या अखेरीस मलाबार युद्धसरावाचे आयोजन करणार असल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेसह, जपान व ऑस्ट्रेलिया या क्वाड देशांबरोबरील भारतीय नौदलाचे सहकार्य चीनच्या इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील महत्त्वाकांक्षेला सुरूंग लावणारी बाब ठरेल, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे. म्हणूनच चीन यामुळे अस्वस्थ झाल्याचा दावा विश्लेषक करीत आहेत.