अझरबैजानने इस्रायलमध्ये दूतावास सुरू केला

तेल अविव – ‘इस्रायल व अझरबैजान यांच्या सुरक्षेला इराण या एकाच शत्रूपासून धोका आहे. इराणला अण्वस्त्रसज्जतेपासून रोखण्यासाठी इस्रायल व अझरबैजानला एकजूट करावी लागेल’, असे इस्रायलचे परराष्ट्रमंत्री एली कोहेन यांनी म्हटले आहे. इस्रायलच्या विशेष भेटीवर आलेल्या अझरबैजानचे परराष्ट्रमंत्री जेहून बेरामोव्ह यांच्याशी चर्चा केल्यानंतर इस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्यांनी इराणविरोधात अझरबैजानकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. परराष्ट्रमंत्री बेरामोव्ह यांच्या उपस्थितीत अझरबैजानने इस्रायलच्या तेल अविव शहरात दूतावास सुरू केला. इस्रायलमध्ये दूतावास सुरू करणारा अझरबैजान हा पहिला शियापंथिय देश ठरल्याचे इस्रायली माध्यमे सांगत आहेत.

अझरबैजानने इस्रायलमध्ये दूतावास सुरू केलाएकेकाळी सोव्हिएत रशियाचा भाग असलेला अझरबैजान हा मध्य आशियातील इंधनसंपन्न देश आहे. सोव्हिएत रशियाच्या विभाजनानंतर 1991 साली अझरबैजान स्वतंत्र देश म्हणून प्रस्थापित झाला. अझरबैजानला मान्यता देणाऱ्या पहिल्या काही देशांमध्ये इस्रायलचा समावेश होता. पुढच्याच वर्षी 1992 साली इस्रायलने अझरबैजानची राजधानी बाकूमध्ये आपला दूतावास सुरू केला होता. रशिया तसेच इराणशी सीमा भिडलेल्या अझरबैजानचे सामरिक महत्त्व लक्षात घेता इस्रायलने या मध्य आशियाई देशाशी मैत्री वाढवित नेली. यामुळे इस्रायल व अझरबैजानमध्ये मोठ्या प्रमाणात व्यापारी तसेच लष्करी सहकार्य प्रस्थापित झाले.

इस्रायलच्या 114 कंपन्या सध्या अझरबैजानमध्ये कार्यरत आहेत. तर इस्रायल आपल्या इंधनाच्या आयातीपैकी 30 टक्के आयात एकट्या अझरबैजानकडून करतो. त्याचबरोबर आर्मेनियाबरोबरच्या संघर्षातही इस्रायलने अझरबैजानला लष्करी सहाय्य पुरविले होते. आर्मेनिया तसेच इराणबरोबर सीमेवर तणाव निर्माण झालेला असताना इस्रायलने अझरबैजानसह लष्करी सराव केला होता.

मात्र गेल्या तीन दशकांपासूनच्या सहकार्यानंतरही अझरबैजानने इस्रायलमध्ये आपला दूतावास सुरू केला नव्हता. पण बुधवारी परराष्ट्रमंत्री जेहून बेरामोव्ह यांच्या उपस्थितीत इस्रायलच्या तेल अविव शहरात अझरबैजानचा दूतावास सुरू झाला. इस्रायलचे परराष्ट्रमंत्री एली कोहेन यांनी अझरबैजानच्या या निर्णयाचे स्वागत केले. तसेच ‘इराणपासून इस्रायल, अझरबैजानबरोबरच क्षेत्रीय स्थैर्य व सुरक्षेला देखील धोका आहे. अझरबैजानने इस्रायलमध्ये दूतावास सुरू केलाइराणच्या धोक्याकडे एकसमान दृष्टीने पाहणाऱ्या इस्रायल व अझरबैजानमधील लष्करी सहकार्य येत्या काळात महत्त्वपूर्ण ठरेल’, असा विश्वास इस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्यांनी व्यक्त केला.

इराणबरोबर सीमावाद असलेला अझरबैजान इस्रायलला लष्करी तळ पुरविणार असल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वी आल्या होत्या. इराणच्या अणुप्रकल्पांवर हल्ला चढविण्यासाठी इस्रायल अझरबैजानच्या तळांचा वापर करू शकतो, असा दावा इस्रायली माध्यमांनी केला होता. इस्रायलने आर्मेनियाविरोधी संघर्षात केलेल्या सहाय्याच्या मोबदल्यात अझरबैजान हे सहकार्य करू शकतो, असे या माध्यमांचे म्हणणे होते. अझरबैजानने हे दावे फेटाळले होते. असे असले तरी इराणविरोधी कारवायांसाठी इस्रायली गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’ने अझरबैजानचा वापर केल्याची माहिती याआधी समोर आली होती.

अशा परिस्थितीत, इस्रायलमधील अझरबैजानचा दूतावास इराणला इशारा देत असल्याचे इस्रायली विश्लेषकांचे म्हणणे आहे.

leave a reply