रशिया-युक्रेन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर बायडेन यांच्या लोकप्रियतेत लक्षणीय घट

लोकप्रियतेत लक्षणीय घटवॉशिंग्टन – राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन येत्या काही तासात कारकिर्दीतील पहिले ‘स्टेट ऑफ द युनियन’ जाहीर करणार आहेत. पण त्याआधीच बायडेन यांची लोकप्रियता ३७ टक्क्यांपर्यंत घसरल्याचे नव्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. याला बायडेन प्रशासनाची परराष्ट्र तसेच आर्थिक धोरणे जबाबदार असल्याचा दावा केला जातो. त्याचबरोबर अमेरिका सध्या भीषण महागाईला सामोरे जात असताना, बायडेन आपल्या अभिभाषणात कोणत्या मुद्याला प्राथमिकता देतात, याकडे अमेरिकन जनता आणि माध्यमांचे लक्ष लागले आहे.

वर्षभरापूर्वी बायडेन यांच्या भूमिकांचे जोरदार समर्थन करणार्‍या अमेरिकेतल्या दोन आघाडीच्या माध्यमांनी हा सर्वेक्षण अहवाल जारी केला. वॉशिंग्टन पोस्ट आणि एबीसी न्यूज नेटवर्क यांच्या सर्वेक्षण अहवालानुसार, अमेरिकेतील फक्त ३७ टक्के जनतेपर्यंत बायडेन यांची लोकप्रियता मर्यादित राहिली आहे. तर ५५ टक्के जनतेने बायडेन यांना अप्रिय नेता ठरविले आहे. सत्ताधारी डेमोक्रॅट आणि विरोधी पक्षातील रिपब्लिकन वगळता, अमेरिकेतील इंडिपेंडेंट गटातील सुमारे ६१ टक्के जनतेने राष्ट्राध्यक्ष बायडेन त्यांचे नेतृत्व आपल्याला अजिबात मान्य नसल्याचे म्हटले आहे. यावरून बायडेन यांच्या लोकप्रियतेत कमालीची घट झाल्याचा दावा, अमेरिकन माध्यमे या सर्वेक्षणातून करीत आहेत.

बायडेन प्रशासनाचे दिशाहीन परराष्ट्र धोरण या घसरणीला जबाबदार असल्याचे सर्वेक्षण करणार्‍या माध्यमांचे म्हणणे आहे. तर अमेरिकेतील आणखी एका वृत्तवाहिनीने विद्यापीठाच्या सहाय्याने केलेल्या सर्वेक्षणात देखील बायडेन यांच्या लोकप्रियतेत घट झाल्याचे म्हटले आहे. यामागे बायडेन प्रशासनाची आर्थिक धोरणे आणि त्यामुळे अमेरिकेत वाढलेली महागाई जबाबदार आहे, असा दावा या वृत्तवाहिनीने केला आहे. सामान्य अमेरिकन जनतेला दोन वेळचे पुरेसे अन्न मिळत नसून बायडेन प्रशासन यासाठी काहीही करत नसल्याची टीका जनता करीत आहे. अमेरिकेतील आणखी एका नियतकालिकाने केलेल्या सर्वेक्षणातून अशाच स्वरुपाचे निष्कर्ष नोंदविले आहेत.

लोकप्रियतेत लक्षणीय घटबायडेन यांनी अमेरिकेची सूत्रे स्वीकारल्यापासून, गेल्या वर्षभरात झालेल्या वेगवेगळ्या सर्वेक्षणांमध्ये राष्ट्राध्यक्ष बायडेन यांची लोकप्रियता सातत्याने घटत चालल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर येत्या वर्षअखेरीस होणार्‍या अमेरिकन कॉंग्रेसच्या निवडणुकीत सत्ताधारी डेमोक्रॅट पक्षाला पराभवाचा सामना करावा लागेल आणि रिपब्लिकन पक्ष बहुमत मिळवेल, असा दावा गेल्या आठवड्याभरातील वेगवेगळ्या सर्वेक्षणातून समोर येत आहे.

दरम्यान, बायडेन यांच्या अभिभाषणाला अवघे काही तास उरलेले असताना अमेरिकेतील आघाडीच्या माध्यमांनी सदर माहिती प्रसिद्ध केली, ही लक्षवेधी बाब ठरते. आपल्या अभिभाषणात बायडेन यांनी युक्रेन-रशिया संघर्षापेक्षाही अमेरिकेत कडाडलेली महागाई आणि वाढत्या बेरोजगारीच्या मुद्यांना अधिक महत्त्व द्यावे, अशी अपेक्षा जनसामान्य करीत आहेत.

आधीचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या कार्यकाळात जग अधिक स्थीर व सुरक्षित होते. पण बायडेन राष्ट्राध्यक्ष बनल्यापासून तालिबानने अफगाणिस्तानचा आणि तिथल्या अमेरिकेच्या शस्त्रास्त्रांचाही ताबा घेतला. इराण अधिक आक्रमक बनला. आता रशिया-युक्रेन समस्या सोडविण्यातही बायडेन यांना दारूण अपयश आल्याची टीका अमेरिकेच्या सोशल मीडियावरून केली जात आहे.

leave a reply