बुडीत कर्ज दोन लाख कोटी रुपयांनी घटली

- दोन महिन्यात होणार ‘बॅड बँक’ची स्थापना

बुडीत कर्जनवी दिल्ली – देशातील बँकांकडील बुडीत कर्जाच्या प्रमाणात मोठी घट झाली आहे. २०१८ सालापासून आतापर्यंत बँकावरील बुडीत कर्जाचा बोजा दोन लाख कोटी रुपयांनी कमी झाला आहे. केंद्र सरकारने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे हे शक्य झाल्याचे केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी राज्यसभेत सांगितले. त्याचवेळी बँकांच्या बुडीत कर्जाच्या समस्येशी सामना करण्यासाठी सोमवारी केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बॅड बँक स्थापन करण्याची घोषणा केली होती. मंगळवारी अर्थ सेवा विभागाचे सचिव देवाशीष पांडा यांनी बॅड बँकची स्थापना दोन महिन्यात केली जाईल, अशी माहिती दिली.

देशातील बँकींग व्यवस्थेसमोरील बुडीत कर्ज सर्वात मोठे संकट म्हणून समोर आले होते. यामुळे कित्येक बँका डबघाईला आल्या होत्या. या समस्येवर गेल्या पाच एक वर्षापासून सरकार काम करीत असून बँकांना आपली बुडीत कर्जाच्या बाबतीत पारदर्शकता आणावी असे सरकारने बजावले होते. तसेच यानंतर अनेक उपाय करण्यात आले. बुडीत कर्जाचा बोजा जास्त असलेल्या बँकांवर काही अंशी निर्बंधही लादण्यात आले. या बँका या संकटातून बाहेर पडाव्यात यासाठी त्यांना भांडवली सहाय्यही वेळोवेळी सरकारने दिले. काही संकटात असलेल्या पुनर्रचना कर्ज खात्यांच्या सुविधाही मागे घेण्यात आल्या. याचे परिणाम दिसत आहेत.

२०१८ साली भारतीय बँकांवर १० लाख ३६ हजार कोटी रुपयांचा बुडीत कर्जाचा बोजा होता. तो कमी होऊन २०२० सालात ८ लाख ८ हजार कोटी रुपये इतका राहिला आहे. एनपीए अर्थात बुडीत कर्जाच्या बाबतीत पारदर्शकता हे सरकारचे धोरण राहिले असून एनपीए कमी करण्यासाठी बँकींग सुधारणांची प्रकिया सातत्याने राबविण्यात येत असल्याचे, कंेंद्रीय अर्थराज्यमंत्री ठाकूर यांनी सांगितले. दरम्यान बुडीत कर्जाच्या समस्येवर सरकार बॅड बँकची स्थापना करणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी अर्थसंकल्पादरम्यान याची घोषणा केली. केंद्र सरकार बॅड बँकची स्थापना करू शकते, अशा बातम्या गेल्या काही दिवसांपासून सातत्याने येत होत्या. अर्थ सेवा विभागातर्फेही यासंबंधीत प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

बॅड बँकेकडे बँडाची बुडीत कर्ज या बँकेकडे सोपविली जातील आणि त्या कर्जांच्या वसूलीची पुढील प्रक्रिया या बँकेद्वारे राबविली जाईल. सध्या अडीच लाख इतके बुडीत कर्ज या बॅड बँकेकडे वळविले जाणार आहे, असे वृत्त आहे. अर्थ सेवा विभागाचे सचिव देवाशीष पांडा यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत पुढील दोन महिन्यात बॅड बँकची स्थापना करण्यात येईल, अशी माहिती दिली आहे.

leave a reply