कॅनबेरा – लडाखच्या एलएसीवरील गलवानमध्ये भारतीय सैन्याबरोबर झालेल्या संघर्षात आपल्या लष्कराने केवळ चार जवान गमावल्याची माहिती चीनने दिली होती. पण या संघर्षात चीनचे याहून कितीतरी अधिक नुकसान झाल्याची माहिती ऑस्ट्रेलियन वृत्तपत्र ‘द क्लॅक्सोन’ने दिली आहे. या संघर्षात चीनने चार नाही तर ४२ जवान गमावले होते, असे या वृत्तपत्राने म्हटले आहे.
चीनमध्ये होणार्या विंटर ऑलिंपिकमध्ये गलवान खोर्यातील संघर्षात जखमी झालेल्या आपल्या अधिकार्याला सन्मान देऊन, चीन या संघर्षात आपल्या लष्कराने पराक्रम गाजविल्याचे चित्र उभे करू पाहत आहे. विशेषतः चिनी जनतेच्या समोर लष्कराचा हा तथाकथित पराक्रम अधिक ठळकपणे समोर यावा, यासाठी चीन धडपडत असल्याचे दिसते. मात्र याच काळात ‘द क्लॅक्सोन’ने ‘गलवान डिकोडेड’ नावाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे.
चीनमधील सोशल मीडियासह इतर ठिकाणी प्रसिद्ध झालेल्या माहितीचा आधार घेऊन गलवानमध्ये झालेल्या संघर्षावर अधिक प्रकाश टाकला. या संघर्षात चीनचे किमान ३८ जवान नदीत बुडून ठार झाल्याचे या ऑस्ट्रेलियन वर्तमानपत्राने म्हटले आहे. मात्र यापैकी एकाच जवानाची माहिती चीनने दिली होती, याकडे सदर वर्तमानपत्राने लक्ष वेधले आहे. त्याचबरोबर चीनने गलवानमधील या संघर्षावर सुरू झालेली चर्चा रोखण्यासाठी कठोर कारवाई सुरू केली होती, याकडेही ‘द क्लॅक्सोन’च्या शोधपत्रकारांनी लक्ष वेधले.
याआधी पाश्चिमात्य देशांमधील काहीजणांनी चीन गलवानसंदर्भात करीत असलेले दावे खोटे असल्याचे म्हटले होते. भारताने या संघर्षात आपले २० जवान शहीद झाल्याचे जाहीर करून यांना राष्ट्रीय सन्मानही दिला होता. पण चीन मात्र ठार झालेल्या आपल्या जवानांची माहिती लपवित असल्याचे वारंवार स्पष्ट झाले होते. चीनच्या लष्कराने भारताहून कितीतरी अधिक प्रमाणात आपले जवान गमावले हे जगजाहीर झाल्यास, आपली अप्रतिष्ठा होईल, अशी चिंता चीनला वाटत आहे. ते टाळण्यासाठी चीन गलवानच्या संघर्षाबाबत खोटीनाटी माहिती अजूनही प्रसिद्ध करीत आहे.
बीजिंगमधल्या विंटर ऑलिंपिकवर भारताचा राजनैतिक बहिष्कार
नवी दिल्ली – गलवानच्या खोर्यात झालेल्या संघर्षात जखमी झालेल्या आपल्या लष्करी अधिकार्याला चीनने ‘बीजिंग विंटर ऑलिंपिक’मध्ये विशेष सन्मान दिला. भारताला चिथावणी देण्यासाठीच चीनने हा निर्णय घेतला होता. याची गंभीर दखल घेऊन भारताने चीनची ही कारवाई दुर्दैवी असल्याचा ठपका ठेवला. याचा निषेध करण्यासाठी भारताचे राजनैतिक अधिकारी या विंटर ऑलिंपिकच्या उद्घाटन व समारोपाला उपस्थित राहणार नाहीत. तसेच भारताची डीडी स्पोर्टस् वाहिनी याचे थेट प्रक्षेपण देखील करणार नाही, अशी घोषणा परराष्ट्र मंत्रालयाने केली.
चीन उघूरवंशियांवर करीत असलेल्या अत्याचाराचा मुद्दा उपस्थित करून अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया व इतर काही देशांनी बीजिंगमध्ये होणार्या विटंर ऑलिंपिकवर राजनैतिक बहिष्कार टाकला होता. यामुळे या देशांचे राजनैतिक अधिकारी बीजिंग ऑलिंपिकच्या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार नव्हते. त्यावेळी खेळात राजकारण आणू नका, असे आवाहन चीनकडून केले जात होते. भारताने चीनबरोबरील संबंध ताणलेले असताना देखील, बीजिंग ऑलिंपिकवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला नव्हता. मात्र चीननेच गलवान खोर्यात जखमी झालेल्या आपल्या लष्करी अधिकार्याला या ऑलिंपिकमध्ये विशेष सन्मान देऊन आपली भारतद्वेष्टी भूमिका जगजाहीर केली होती.
अपेक्षेनुसार याचे पडसाद उमटले आहेत. चीनच्या या कुरापतीला भारताने उत्तर दिले असून आता भारतही बीजिंगमधल्या या विंटर ऑलिंपिकमध्ये राजनैतिक बहिष्कार टाकणार आहे. भारताने घेतलेल्या या निर्णयाला सर्वस्वी चीनच जबाबदार असल्याचे दिसत आहे.