वॉशिंग्टन – वाटाघाटींद्वारे अणुकार्यक्रम रोखण्यात अपयश आल्यास, लष्करी कारवाई केली जाईल, असा इशारा बायडेन प्रशासनाने इराणला दिला होता. पण बायडेन प्रशासनाकडून देण्यात येणार्या धमक्या पोकळ असल्याची टीका अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी केली. इराणबरोबर कुठल्याही शर्तींवर अणुकरार करण्यासाठी बायडेन प्रशासन प्रयत्नांची पराकाष्टा करीत असल्याचा गंभीर आरोप बोल्टन यांनी केला आहे.
मंगळवारपासून व्हिएन्ना येथे अणुकरारावरील चर्चेला वेग आल्याचे दिसत आहे. गेल्या आठवड्यात बायडेन प्रशासनाने इराणवरील काही निर्बंध मागे घेण्याची तयारी केली होती. पण अमेरिका व पाश्चिमात्य देशांनी ठोस पावले उचलल्याशिवाय आपण अणुकरारात सहभागी होणार नाही, असे इराण ठामपणे सांगत आहे. इराण अशी ताठर भूमिका घेत असताना, बायडेन प्रशासन मात्र नमते घेत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. यावर अमेरिकेतून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
पण बायडेन प्रशासनातीलच काही अधिकारी, सत्ताधारी डेमोक्रॅट पक्षाचे वरिष्ठ सिनेटर तसेच बायडेन यांचे विरोधक यावर सडकून टीका करीत आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी देखील इराणवरील निर्बंध शिथिल करणार्या बायडेन प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत.
‘कितीही किंमत मोजावी लागली तरी इराणबरोबरचा अणुकरार करायचाच, हे बायडेन प्रशासनाने ठरवून टाकले आहे. यासाठी इराणला सवलतींमागून सवलती देण्याचा सपाटा बायडेन प्रशासनाने लावला आहे’, अशी जळजळीत टीका बोल्टन यांनी केली.
सवलती देऊनही इराण अणुकरार करणार नसेल, तर लष्करी कारवाईचा पर्यायही आपल्यासमोर असल्याचा इशारा बायडेन प्रशासनाने काही दिवसांपूर्वी दिला होता. पण माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बोल्टन यांनी या इशार्यात काहीही दम नसल्याचे म्हटले आहे. ‘ही पोकळ धमकी आहे. बायडेन प्रशासनाने अशा कुठल्याही लष्करी कारवाईची तयारी केलेली नाही. बायडेन प्रशासनाला ओळखून असलेल्या इराणला अशा धमक्यांची पर्वा करण्याची गरज वाटत नाही’, असे बोल्टन म्हणाले.
काही दिवसांपूर्वी बायडेन यांच्याच डेमोक्रॅटस पक्षाचे वरिष्ठ सिनेटर रॉबर्ट मेनेंडेस यांनी इराणबरोबर सुरू असलेल्या वाटाघाटींवर प्रश्न उपस्थित केला होता. व्हिएन्ना येथील अणुकरार यशस्वी ठरला तर, इराण आपल्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमात बदल करणार नाही किंवा आखातातील दहशतवादी संघटनांना समर्थन देण्याचीही थांबविणार नाही, याची जाणीव मेनेंडेस यांनी करून दिली होती. त्यामुळे सत्ताधारी डेमोक्रॅट पक्षातील वरिष्ठ सिनेटरच बायडेन प्रशासनाच्या भूमिकेशी सहमत नसल्याचे दिसत आहे.
दरम्यान, इराणचा अणुकार्यक्रम हा ‘ब्रेकआऊट टाईम’वर पोचल्याचा दावा आंतरराष्ट्रीय विश्लेषक करीत आहेत. अणुकराराशिवाय पुढील काही आठवड्यांमध्ये इराण अणुबॉम्बच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या साहित्याची जमवाजमव करील, असा इशारा विश्लेषक देत आहेत. व्हिएन्ना येथे अणुकरार केल्यानंतरही इराण ही क्षमता पुढील वर्षभरात प्राप्त करील, असे या विश्लेषकांचे म्हणणे आहे. अमेरिकेच्या आघाडीच्या दैनिकाने काही दिवसांपूर्वी हा इशारा प्रसिद्ध केला होता.