वॉशिंग्टन – डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना जॉन केरी यांनी आपल्या मर्यादा ओलांडून इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांची घेतलेली भेट ही अमेरिकाविरोधी होती. केरी-झरिफ भेट अमेरिकेच्या इराणबाबतच्या धोरणांना हादरा देणारी होती. पण अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी इराणचा अणुकरार पुनर्जिवित करण्यासाठी सुरू केलेल्या हालचाली, बायडेन यांच्या योजना त्याहून अधिक धोकादायक आहेत. अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी अमेरिकी वृत्तवाहिनीशी बोलताना हा इशारा दिला.
अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी २०१८ साली इराणबरोबरच्या अणुकरारातून माघार घेतली होती. त्याचबरोबर अधिकाधिक कठोर निर्बंध लादून इराणला जेरीस आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. पण माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या काळात परराष्ट्रमंत्री राहिलेल्या जॉन केरी यांनी इराणचे परराष्ट्रमंत्री जावेद झरिफ यांची भेट घेतली होती. यासाठी केरी यांनी ट्रम्प यांच्या प्रशासनाची किंवा अमेरिकन काँग्रेसची परवानगी घेतली नव्हती. याप्रकरणी ट्रम्प प्रशासनातील माजी अधिकारी त्याचबरोबर अमेरिकेत आश्रय घेणार्या इराणी निर्वासितांनी देखील केरी यांच्यावर जोरदार टीका सुरू केली आहे. केरी-झरिफ भेट ही अमेरिकाविरोधी होती, असे आरोप केले आहेत.
पण केरी-झरिफ यांच्या भेटीपेक्षाही राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे इराणबाबतचे धोरण अमेरिका व मित्रदेशांसाठी अधिक धोकादायक असल्याचे अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ म्हणाले. अणुकरार पुनर्जिवित केला तर इराणचा अण्वस्त्रसज्जतेचा मार्ग प्रशस्त होईल, याकडे पॉम्पिओ यांनी लक्ष वेधले. तर, ‘याआधी २०१५ साली अणुकरार झाल्यानंतर इराणला मोठ्या प्रमाणात आर्थिक सवलती, पैसा पुरविला होता आणि अधिकारही दिले होते. पण याचा काय फायदा झाला. या करारानंतर आखातातील दहशतवादी हल्ले अधिक वाढले, इराण अधिक आक्रमक झाला आणि या करारामुळे अमरिकेने आखातातील आपले मित्रदेश गमावले’, याची आठवण पॉम्पिओ यांनी करून दिली.
‘आत्ताही बायडेन प्रशासन अमेरिकेसाठी धोकादायक असलेली इराणची अत्याचारी राजवट, हुकूमशहा यांची खुशामत करण्याच्या तयारीला लागली आहे’, अशी टीका पॉम्पिओ यांनी केली. पण यापेक्षा ट्रम्प प्रशासनाने इराणबाबत स्वीकारलेली आक्रमक निर्बंधांची भूमिका राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी स्वीकारावी, असे आवाहन अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्र्यांनी केले.