अलास्कामधील द्विपक्षीय चर्चेमध्ये अमेरिका व चीनमध्ये चकमक उडाली

अलास्का/बीजिंग – अलास्कामध्ये सुरू असलेल्या अमेरिका व चीनमधील उच्चस्तरीय बैठकीत दोन देशांच्या नेत्यांमध्ये जबरदस्त शाब्दिक चकमक उडाली. अमेरिकेने झिंजिआंग, हाँगकाँग व तैवानचा मुद्दा उपस्थित करून चीनला खडसावले. तर चीनच्या नेत्यांनी, अमेरिकेने जगाचे नेतृत्त्व स्वतःकडे असल्याच्या मानसिकतेतून चीनशी चर्चा करु नये, असे बजावले. अमेरिकेतील बायडेन प्रशासन माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या तुलनेत चीनच्या मुद्यावर सौम्य भूमिका घेईल, असे मानले जात होते. मात्र विरोधी पक्ष असणार्‍या रिपब्लिकन नेतृत्त्वाकडून चीनच्या प्रश्‍नावर टाकल्या जाणार्‍या दबावामुळे बायडेन प्रशासनाला चीनविरोधात भूमिका स्वीकारावी लागल्याचे दिसत आहे.

गुरुवारी अमेरिकेच्या अलास्कामधील अँकरेज येथे अमेरिका व चीनमधील उच्चस्तरिय बैठकीला सुरुवात झाली. बैठकीला अमेरिकेकडून परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलिवन यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत. तर चीनकडून कम्युनिस्ट पार्टीचे वरिष्ठ नेते यांग जिएची व परराष्ट्रमंत्री वँग यी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले आहेत. बैठकीच्या सुरुवातीपासूनच दोन देशांमध्ये चकमकींना सुरुवात झाल्याचे सांगण्यात येते.

आपल्या वक्तव्यात अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी, अमेरिका नेहमीच कायदा व नियमांच्या आधारे उभ्या असणार्‍या व्यवस्थेच्या सुरक्षेसाठी ठामपणे उभी राहिल, असे बजावले. अशी व्यवस्था कायम राहिली नाही तर जगात तीव्र हिंसाचार घडेल, असा दावाही त्यांनी केला. चीनकडून झिजिंआग, हाँगकाँग व तैवानमध्ये सुरू असलेल्या कारवाया, अमेरिकेवरील सायबरहल्ले आणि अमेरिकेच्या मित्रदेशांवर आर्थिक दडपण टाकण्याचे प्रयत्न यामुळे जागतिक स्थैर्याला धोका पोहोचल्याचा आरोपही परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी केला.

ब्लिंकन यांच्या या वक्तव्यावर चीनचे वरिष्ठ नेते यांग जिएची यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘अमेरिका जगाचे नेतृत्त्व करीत नाही, तर फक्त अमेरिकेच्या सरकारचे प्रतिनिधीत्व करते. अमेरिकेला इतर देशांच्या वतीने बोलण्याचा अधिकार नाही’, असे जिएची म्हणाले. त्याचवेळी अमेरिकेने चीनच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करु नये, असा इशाराही त्यांनी दिला. अमेरिकेने स्वतःची प्रतिमा सुधारावी आणि आपल्या स्टाईलची लोकशाही इतर देशांवर लादू नये, असा सल्लाही यांग जिएची यांनी यावेळी दिला.

अमेरिका व चीनच्या बैठकीत उडालेली शाब्दिक चकमक दोन देशांमधील तणाव अद्यापही कायम असल्याचे दाखवून देणारी ठरते. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या चार वर्षात चीनविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. व्यापार, तंत्रज्ञान, हेरगिरी, उघुरवंशियांवरील अत्याचार यासारख्या अनेक मुद्यांवरून ट्रम्प यांनी सातत्याने चीनला लक्ष्य केले होते. ट्रम्प यांच्या तुलनेत बायडेन चीनबाबत फारसे आक्रमक धोरण न राबविता सामोपचाराची भूमिका घेतील, असे दावे करण्यात येत होते.

मात्र गेल्या काही आठवड्यात बायडेन प्रशासनही चीनविरोधात आग्रही भूमिका घेत असल्याचे प्रमुख नेते व अधिकार्‍यांच्या वक्तव्यावरून दिसून येत आहे. यामागे अमेरिकेतील विरोधी पक्ष असणार्‍या रिपब्लिकन नेत्यांकडून चीनसंदर्भात सातत्याने करण्यात येणारी आक्रमक वक्तव्ये व प्रशासनावर टाकण्यात येणारा दबाव कारणीभूत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. या दबावामुळे बायडेन प्रशासनाला चीनविरोधातील यापूर्वीचे धोरण बदलणार नसल्याचे वारंवार सिद्ध करावे लागत आहे. अलास्कामधील बैठकीत बायडेन प्रशासनाकडून घेण्यात आलेली कठोर व आक्रमक भूमिकाही त्याचाच भाग असल्याचे समोर येत आहे.

leave a reply