न्यूयॉर्क – ‘कोरोनाव्हायरसविरोधी लढ्यात राहिलेल्या त्रुटी आणि उणीवा यामुळे आपणच दहशतवाद्यांना जैविक हल्ला चढविण्यासाठी खिडकी खुली करुन दिली आहे. येत्या काळात जगभरातील दहशतवादी कोरोनाव्हायरससारखा विषाणू मिळवून भीषण हल्ले चढवू शकतात’, असा खळबळ उडविणारा इशारा संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अॅन्टोनियो गुतेरस यांनी दिला. त्याचबरोबर या साथीमुळे सामाजिक अस्थैर्य आणि हिंसाचार वाढून कोरोनाव्हायरसविरोधी लढा कमकुवत होऊ शकतो, अशी चिंता राष्ट्रसंघाच्या महासचिवांनी व्यक्त केली.
कोरोनाव्हायरसमुळे जगभरात ९७ हजारांहून अधिक जणांचा बळी गेला असून १६ लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. या साथीच्या फैलावावर तसेच त्याच्या उगमस्थानावर चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या विशेष बैठकीचे गुरुवारी आयोजन करण्यात आले होते. वीडियो कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आलेल्या या बैठकीत कोरोनाव्हायरसमुळे आंतरराष्ट्रीय शांती आणि सुरक्षेवर परिणाम झाल्याची चिंता व्यक्त करण्यात आली.
राष्ट्रसंघाच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच अशा स्वरुपाच्या महामारीचा सामना करावा लागत असून या साथीचे परिणाम प्रदिर्घ काळ जाणवतील, असा दावा राष्ट्रसंघाच्या महासचिवांनी केला. ‘या साथीविरोधात लढताना कुणीही तयार नव्हते, हे जगजाहिर झाले आहे. याचा पुरेपुर फायदा उचलून दहशतवादी संघटना कोरोनाव्हायरसच्या साथीचा मुकाबला करण्यात गुंतलेल्या जैविक हल्ल्याचे लक्ष्य करू शकतात’, याची भयावह जाणीव गुतेरस यांनी करुन दिली.
या साथीमुळे काही देशांमध्ये निर्माण झालेल्या राजकीय अस्थैर्याचा फायदा घेऊन येथील विरोधी गट किंवा नेते बंड किंवा अराजक माजवितील. असे झाले तर जगभरात आधीच सुरू असलेला संघार्ष अधिक आक्राळविक्राळ स्वरुप धारण करतील, अशी भीती गुतेरस यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, आखातातील कट्टरपंथीय संघटना इस्लामिक ब्रदरहुडचा हस्तकांनी आपल्या संघटनेच्या समर्थकांना कोरोनाव्हायरसच्या साथीचा संधीसारखा वापर करण्याचा सल्ला दिला होता. अमेरिकेतील या संघटनेच्या एका नेत्याने इजिप्तमधील राष्ट्राध्यक्ष सिसी यांचे सरकार उलथण्यासाठी, या साथीचा वापर करता येऊ शकतो, असे सुचविले होते. या साथीची लागण करून घ्या आणि राष्ट्राध्यक्ष सिसी तसेच इजिप्त्च्या सरकारच्या इतर वरिष्ठ अधिकारी व मंत्र्यांना या साथीची लागण होईल, यासाठी प्रयत्न करा, असे इस्लामी ब्रदरहुडच्या या हस्तकांनी म्हटले होते.