काबुल – अफगाणिस्तानच्या हेरात प्रांतात झालेल्या कारबॉम्ब स्फोटात आठ जणांचा बळी गेला असून 50हून अधिकजण जखमी झाले आहेत. बळींपैकी एक जण व जखमीपैकी 11 जण अफगाणी सुरक्षा दलांचे असल्याची माहिती दिली जाते. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेने या घातपाताची कडक शब्दात निर्भत्सना केली असून अफगाणिस्तानातील परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे.
या स्फोटाची जबाबदारी कुठल्याही संघटनेने स्वीकारल्याचे वृत्त नाही. मात्र याला तालिबान जबाबदार असावी, असा दाट संशय व्यक्त केला जातो. अफगाणिस्तानात याआधी झालेल्या बॉम्बस्फोट व इतर घातपातांपैकी काहींची जबाबदारी ‘आयएस’ या दहशतवादी संघटनेने स्वीकारली होती. पण गेल्या काही दिवसांमध्ये अफगाणिस्तानच्या लष्कराने तालिबानच्या विरोधात आक्रमक मोहीम हाती घेतली होती. यात तालिबानचे दहशतवादी मोठ्या प्रमाणात ठार झाल्याच्या बातम्या येत होत्या. त्याचा सूड घेण्यासाठी तालिबानने हा घातपात घडविला असण्याची दाट शक्यता समोर येत आहे.
अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित करण्यासाठी अफगाणी सरकारने तालिबानशी चर्चा करावी, अशी मागणी अमेरिका करीत आहे. पुढच्या काळात अफगाणी सरकारने यासाठी पुढाकार घेतला नाही, तर अमेरिका ठरल्यानुसार 1 मेपर्यंत आपले सारे सैन्य अफगाणिस्तानातून माघारी घेईल. त्यानंतर तालिबान पुन्हा अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यावाचून राहणार नाही, असा इशारा अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांना दिला होता.
मात्र तालिबानबरोबरील चर्चेबाबत अफगाणिस्तानच्या सरकारची भूमिका अत्यंत वेगळी आहे. दोहा येथे झालेल्या शांतीकरारानुसार तालिबानने आपण अफगाणिस्तानातील हिंसाचार कमी करण्याचे आश्वासन अमेरिकेला दिले होते. मात्र त्याचे पालन तालिबान करीत नसून उलट तालिबानच्या हिंसाचारात अधिकच वाढ झाली आहे, असा आक्षेप अफगाणिस्तानचे सरकार घेत आहे. अशा परिस्थितीत तालिबानशी चर्च करणे अवघड होऊन बसल्याचे अफगाणिस्तानच्या सरकारचे म्हणणे आहे. यामुळे निर्माण झालेला तिढा सोडविण्यासाठी अमेरिकेने भारत, पाकिस्तान, इराण व रशिया या देशांबरोबर चर्चा करण्याची तयारी दाखविली होती.
रशियाने देखील स्वतंत्रपणे अफगाणिस्तानच्या शांतीप्रक्रियेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तालिबानला अफगाणिस्तानच्या अंतरिम सरकारमध्ये स्थान द्या, अशी मागणी रशियाने केली आहे. यामुळे तालिबान अफगाणिस्तानच्या राजकीय प्रक्रियेत सहभागी होईल, त्याने बर्याच समस्या सुटतील, असा विश्वास रशियन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोव्हा यांनी व्यक्त केला आहे. तुर्कीनेही अफगाणिस्तानविषयक शांतीचर्चेचे आयोजन केले असून एप्रिल महिन्यात ही चर्चा पार पडणार आहे.