बीजिंग/साओ पावलो – ब्राझिलने व्यापार व आर्थिक व्यवहारांमध्ये चीनच्या युआन चलनाचा वापर करण्यास मान्यता दिली आहे. बुधवारी चीनमध्ये पार पडलेल्या सेमिनारमध्ये यासंदर्भातील करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. ब्राझिल ही लॅटिन अमेरिकेतील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असून चीन व ब्राझिलमधील द्विपक्षीय व्यापार तब्बल 150 अब्ज डॉलर्स इतका आहे.
चीनमध्ये नुकतेच ‘ब्राझिल-चीन बिझनेस सेमिनार’चे आयोजन करण्यात आले होते. या सेमिनारसाठी दोन्ही देशांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 500हून अधिक उद्योजक उपस्थित होते. ब्राझिलचे कृषीमंत्री कार्लोस फवारो व ‘एक्सपोर्ट ॲण्ड इन्व्हेस्टमेंट प्रमोशन एजन्सी’चे(ॲपेक्स) प्रमुख जॉर्ज व्हिआना यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण व्यापारी करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. दोन देशांमध्ये एकूण 20 करारांवर स्वाक्षऱ्या झाल्याची माहिती ब्राझिलच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली. यात इंधन, ऊर्जा, खनिज, पायाभूत सुविधा, बँकिंग, शेती, शिक्षण, आरोग्य आणि माहिती व दूरसंचार या क्षेत्रातील करारांचा समावेश आहे.
यात चीनच्या युआन वापरासंदर्भातील करार सर्वाधिक महत्त्वाचा व लक्ष वेधून घेणारा ठरला. करारानुसार ब्राझिल व चीनमधील व्यापार तसेच आर्थिक सेवांशी निगडित व्यवहारात यापुढे युआन व ब्राझिलचे चलन रिआलचा वापर करण्यात येईल. यापूर्वी हे व्यवहार अमेरिकी डॉलरमध्ये करण्यात येत होते. युआन व रिआलच्या वापरामुळे दोन देशांमधील व्यापाराला अधिक गती मिळेल तसेच व्यवहार अधिक सुटसुटीत होईल, असा दावा ब्राझिलच्या अधिकाऱ्यांनी केला. या सेमिनारमध्ये ब्राझिलमधील ‘बँको बोकॉम बीबीएम’ या बँकेने चीनच्या ‘सीआयपीएस’ या बँकिंग व्यवहार यंत्रणेचा वापर सुरू करीत असल्याची घोषणा केली. ‘चायना इंटरबँक पेमेंट सिस्टिम’ असे नाव असलेली ही यंत्रणा ‘स्विफ्ट’ या आंतरराष्ट्रीय यंत्रणेला पर्याय म्हणून उभारण्यात आली आहे. ‘बँको बोकॉम बीबीएम’ ही चीनच्या ‘सीआयपीएस’चा वापर करणारी पहिली लॅटिन अमेरिकी बँक ठरली आहे. त्याचवेळी चीनच्या ‘इंडस्ट्रिअल ॲण्ड कमर्शिअल बँके’ची ब्राझिलमधील शाखा युआनच्या व्यवहारांची जबाबदारी सांभाळेल, असेही जाहीर करण्यात आले आहे.
चीन व ब्राझिल हे परस्परांचे सर्वात मोठे व्यापारी भागीदार देश म्हणून ओळखण्यात येतात. ब्राझिलच्या एकूण आयातीपैकी 20 टक्क्यांहून अधिक वाटा चीनचा आहे. तर ब्राझिलमधून निर्यात होणाऱ्या उत्पादनांमध्ये 30 टक्क्यांहून अधिक निर्यात चीनमध्ये होते. गेल्या दोन दशकांमध्ये ब्राझिल व चीनमधील व्यापारात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून 2009 साली चीनने अमेरिकेला मागे टाकून ब्राझिलचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार म्हणून स्थान पटकावले होते. चीनने लॅटिन अमेरिकेत केलेल्या गुंतवणुकीत ब्राझिल पहिल्या स्थानावर आहे. या देशातील ऊर्जा क्षेत्र व इंधन उत्खनन यात चीनने अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.