ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांचा लॉकडाऊनला विरोध

साओ पावलो – आत्तापर्यंत कोरोनाव्हायरसने ब्राझीलमधील ९२ जणांचा बळी घेतला तर ब्राझीलमधील ३४०० जणांना या साथीची लागण झाली आहे. इतर देशांचा अनुभव लक्षात घेता ब्राझीलच्या सरकारने तत्काळ देशव्यापी लॉकडाऊन घोषित करावा, अशी मागणी या देशात केली जात आहे. मात्र ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेर बोल्सोनारो ही मागणी मान्य करायला तयार नाहीत उलट लॉकडाऊनमुळे फार मोठे आर्थिक संकट कोसळेल असे राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो यांचे म्हणणे आहे. म्हणूनच स्वतः बाजारात जाऊन राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो यांनी त्याचे व्हिडिओज् सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
ब्राझीलमध्ये लॉकडाऊन घोषित केला तर अर्थव्यवस्थेचा बोजवारा उडेल, अशी भिती राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो यांना सतावत आहे. म्हणून राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो देशात “ब्राझील कान्ट स्टॉप” ही मोहीम राबवून देशवासियांचे मनोधैर्य वाढवित आहेत. रविवारी राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो यांनी  ब्राझिलीयामधल्या मार्केटला भेट दिली. इथे त्यांनी  व्यापाऱ्यांची चर्चा  केली आणि कोरोनाव्हायरसला घाबरून न जाता योग्य ती काळजी घेऊन आपले काम करण्याचा सल्ला दिला. याचे व्हिडिओज् प्रसिद्ध झाले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून ब्राझीलमध्ये कोरोनाव्हायरसची साथ वेगाने पसरत असून रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा बिकट परिस्थितीतही राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो देशात लॉकडाऊन लागू न करण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत.  शुक्रवारी राष्ट्राध्यक्षांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात “काहीजण कोरोनामुळे मरतील पण त्यासाठी अर्थव्यवस्था बंद करता येणार नाही,” असे धक्कादायक विधान केले होते. तसेच ब्राझीलमध्ये कोरोनाव्हायरसने जाणा ऱ्यांची  संख्या  वाढवून सांगितली जात असल्याचा आरोप  त्यांनी केला.
मात्र त्यांच्या या भूमिकेवर  ब्राझीलच्या २६ प्रांतातल्या गव्हर्नरांनी कडाडून विरोध केला असून त्यांनी सार्वजनिक वाहतूक आणि बाजारपेठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अर्थव्यवस्थेचे कारण पुढे करून ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जनतेच्या जीवाशी खेळ करीत असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. ज्या देशाने लॉकडाऊन करण्यास विलंब केला  त्या देशांमध्ये कोरोनाव्हायरसची साथ मृत्यूचे थैमान घालत आहे. याकडे विरोधक लक्ष वेधत आहे.

leave a reply