अमेरिकेपेक्षा ब्रिटनने इराणविरोधी आघाडीचे नेतृत्व करावे

- अमेरिकेचे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन

आघाडीचे नेतृत्ववॉशिंग्टन/लंडन – ‘अणुकार्यक्रम आणि आपल्या लष्करी सामर्थ्याच्या जोरावर आखातात दहशत निर्माण करणाऱ्या इराणच्या खामेनी राजवटीला ब्रिटन, अमेरिका, सौदी अरेबिया आणि इस्रायल यांनी आंतरराष्ट्रीय आघाडी उघडून जबरदस्त उत्तर द्यावे. इराणच्या विरोधातील या आघाडीचे नेतृत्त्व ज्यो बायडेन यांनी नाही तर बोरिस जॉन्सन यांनी करावे’, असे अमेरिकेचे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी सुचविले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे नेतृत्व आणि परराष्ट्र धोरणांबाबत अमेरिकेत नाराजी वाढत असल्याचे बोल्टन यांच्या विधानातून स्पष्टपणे दिसत आहे.

गेल्या महिन्यात मर्सर स्ट्रीट या इस्रायली जहाजावर ड्रोन हल्ले झाले होते. ओमानच्या सागरी क्षेत्राजवळ झालेल्या या हल्ल्यात जहाजावरील दोन कर्मचाऱ्यांचा बळी गेला होता. यापैकी एक ब्रिटनचा नागरिकाचा समावेश होता. या हल्ल्यासाठी ब्रिटन व इस्रायलने इराणला जबाबदार धरले होते. या घटनेनंतर इस्रायल आणि ब्रिटनमधून तीव्र प्रतिक्रिया आल्या असून ब्रिटनने पूर्व येमेनेमध्ये स्पेशल फोर्सेसचे जवान रवाना केले. ब्रिटीश नागरिकाचा बळी घेणारा देश किंवा संलग्न संघटनांवर कारवाई करण्यासाठी ब्रिटनने ही तैनाती केल्याचे माध्यमांनी म्हटले होते.

अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि संयुक्त राष्ट्रसंघातील माजी राजदूत जॉन बोल्टन यांनी ब्रिटनच्या वर्तमानपत्रासाठी लिहिलेल्या लेखात इराणविरोधी कारवाईचे नेतृत्व करण्याचे आवाहन केले. इराणमध्ये पार पडलेल्या निवडणुकीनंतर जहालमतवादी सर्वोच्च नेत्याला साथ देण्यासाठी राष्ट्राध्यक्षाची निवड झाल्याचे बोल्टन यांनी या लेखात स्पष्ट केले. इराणच्या या जहाल नेतृत्वासमोर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांचे नेतृत्व टिकणार नाही, असा दावा अमेरिकेच्या माजी सुरक्षा सल्लागारांनी केला.

आघाडीचे नेतृत्वइराणच्या विरोधात युरोपिय मित्रदेश, आखातातील सौदी अरेबिया, युएई आणि इस्रायल या देशांची आंतरराष्ट्रीय आघाडी उघडण्यासाठी कणखर नेतृत्वाची गरज असल्याचे बोल्टन म्हणाले. ‘ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी याआधी आपले कणखर नेतृ त्व दाखवून दिले आहे. त्यामुळे अमेरिका, युरोपिय देश, इस्रायल, सौदी व युएई अशा इराणविरोधी आंतरराष्ट्रीय आघाडीचे जॉन्सन यांनी नेतृत्व करावे.

ब्रिटनच्या नेतृत्वाखालील देशांची आघाडी अधिक प्रभावी आणि इराणच्या राजवटीला हादरे देणारी ठरेल’, असा दावा बोल्टन यांनी केला. ‘इराणचे नेतृत्व अधिकाधिक आक्रमक होत असताना पाश्‍चिमात्य देश बघ्याची भूमिका घेत आहेत. याविरोधात जॉन्सन महत्त्वाची भूमिका स्वीकारू शकतात. कारण अणुकरारात सहभागी असलेल्या इतर युरोपिय नेत्यांच्या तुलनेत जॉन्सन यांच्यासमोरील राजकीय आव्हाने कमी आहेत’, असे बोल्टन यांनी ब्रिटीश वर्तमानपत्रात लिहिलेल्या लेखात म्हटले आहे. येत्या काही महिन्यात जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात येत आहे. तर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासमोर पुढच्या वर्षीच्या निवडणुकीचे मोठे आव्हान असल्याचे आठवण बोल्टन यांनी करून दिली.

अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या नेतृत्वावरील अविश्‍वास वाढत चालला आहे. माजी राष्ट्राध्यक्ष, परराष्ट्रमंत्री, संरक्षणमंत्री तसेच त्यांचे सल्लागार आणि पत्रकार व विश्‍लेषक बायडेन यांच्या कमकुवत नेतृत्वावर टीका करून त्यांच्यावर अविश्‍वास व्यक्त करीत आहेत. अशा परिस्थितीत बोल्टन यांनीही बायडेन यांच्या नेतृत्त्वावर व्यक्त केलेला अविश्‍वास बरेच काही सांगून जात आहे.

leave a reply