बीएसएफ सीमासुरक्षेसाठी ४३६ ड्रोन्ससह ‘अँटी ड्रोन सिस्टिम’ खरेदी करणार

नवी दिल्ली – भारतीय सीमा सुरक्षादलाने (बीएसएफ) पााकिस्तान व बांगलादेश सीमेच्या सुरक्षेसाठी ४३६ ड्रोन्ससह ‘अँटी ड्रोन सिस्टिम’च्या खरेदीला मान्यता दिली आहे. गेल्या वर्षभरात पाकिस्तानने पंजाब तसेच जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रे पाठविण्यासाठी ड्रोन्सचा वापर सुरू केल्याचे समोर आले आहे. दोन दिवसांपूर्वीच पाकिस्तान, जम्मू-काश्मीरच्या आंतरराष्ट्रीय सीमेजवळच्या लष्कराच्या तळांवर ड्रोनद्वारे बॉम्बहल्ले करण्याच्या तयारीत आहे, असा इशारा बीएसएफच्या गुप्तचर विभागाने दिला होता. या पार्श्वभूमीवर ड्रोन व ‘अँटी ड्रोन सिस्टिम’च्या खरेदीचा प्रस्ताव लक्ष वेधून घेणारा ठरतो.

'अँटी ड्रोन सिस्टिम'

बीएसएफच्या ‘कॉम्प्रेहेन्सिव्ह इंटिग्रेटेड बॉर्डर मॅनेजमेंट'(सीआयबीएम) योजनेेअंतर्गत पाकिस्तान आणि बांगलादेशच्या सीमारेषेवरच्या एकूण १९२३ चौक्या सेन्सर्स, सीसीटीव्ही आणि ड्रोनने सुसज्जित केल्या जाणार आहेत. यातल्या १५०० चौक्या ड्रोन्स उडवण्यासाठी आणि ड्रोन्स विरोधी सिस्टिम वापरण्यासाठी सक्षम असतील. मिनी आणि मायक्रो ड्रोन्सच्या खरेदीसाठी सुमारे ८८ कोटी रुपये खर्च येईल, अशी माहिती गृह मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. बीएसएफ सध्या संवेदनशील मानल्या जाणाऱ्या पंजाबच्या सीमेवर स्वदेशी बनावटीच्या ‘अँटी ड्रोन सिस्टिम’ची चाचणी करीत असल्याचेही सांगण्यात आले.

गेल्या एका वर्षात पाकिस्तान पंजाबमधील खलिस्तानी दहशतवाद्यांना व जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांना रायफल्स, पिस्तूल आणि ग्रेनेड्स देण्यासाठी चीनच्या ड्रोन्सचा वापर करीत आहे. काही दिवसांपूर्वी पंजाबच्या सीमारेषेवर घुसखोरी करणाऱ्या पाच दहशतवाद्यांना बीएसएफच्या जवानांनी मारले होते. या जवानांकडून शस्त्रास्त्रे आणि अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. गेल्याच महिन्यात काश्मीरच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानचे शस्त्रास्त्र तस्करी करणारे ड्रोन पाडून दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळला होता. अमेरिकन बनावटीच्या ‘एम ४’ या ड्रोनमध्ये रायफलसह सात ग्रेनेड आणि इतर शस्त्रसाठ्यांची तस्करी करण्यात येत होती.

या घटनांच्या पार्श्वभूमीवर बीएसएफच्या गुप्तचर विभागाने पाकिस्तान जम्मू-काश्मीरच्या आंतरराष्ट्रीय सीमेजवळच्या सांबा सेक्टरमधील लष्कराच्या तळांवर ड्रोनद्वारे बॉम्बहल्ले करण्याच्या तयारीत आहे, असा इशारा दिला होता. या संभाव्य हल्ल्यांची माहिती भारतीय लष्करासह अन्य सुरक्षा यंत्रणांना देण्यात आली आहे. ह्या हल्ल्यांचा धोका लक्षात घेता बीएसएफने सीमारेषेवर ड्रोन सिस्टिम तैनात करण्यासाठी दिलेली मंजुरी सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची ठरते.

leave a reply