दुबई – हजारो कंटेनर्स घेऊन युरोपसाठी प्रवास करणारे विशालकाय मालवाहू जहाज सुएझ कालव्यात अडकून बसले आहे. ‘एमव्ही एव्हर गिव्हन’ नावाच्या या जहाजामुळे सुएझ कालव्याद्वारे आशिया व युरोपला जोडणारी सागरी वाहतुकीची जबरदस्त कोंडी झाली आहे. याचा आंतरराष्ट्रीय व्यापारी वाहतुकीवर मोठा परिणाम होत आहे. सोसाट्याच्या वादळामुळे सदर जहाज कालव्यात आडवे झाले, असा दावा केला जातो.
जगातील सर्वात मोठे मालवाहू कंटेनर जहाज म्हणून ओळखले जाणारे ‘एमव्ही एव्हर गिव्हन’ मंगळवारी सुएझच्या कालव्यात अडकले. तैवान स्थित ‘एव्हरग्रीन मरिन कॉर्पोरेशन’ या शिपिंग कंपनीकडून सदर कंटेनर जहाज ऑपरेट केले जाते. सदर कंटेनर जहाजावर मध्य अमेरिकेतील पनामाचा ध्वज होता. आशियातून युरोपमधील नेदरलँडसाठी हे जहाज प्रवास करीत होते. यासाठी सदर जहाजाने सुएझ कालव्याचा मार्ग स्वीकारला होता.
सुएझ कालव्याच्या मध्यावर पोहोचल्यानंतर सदर जहाज पूर्वेकडे तोंड करून अडकले. सॅटेलाईट तसेच स्थानिक माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या फोटोग्राफ्सनुसार एमव्ही एव्हर गिव्हन जहाजाच्या पुढील भागाने सुएझ कालव्याच्या किनार्याला धडक दिली आहे. यामध्ये सदर जहाजाचे किती नुकसान झाले, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. पण ऐन वाहतुकीच्या मार्गात कंटेनरने भरलेले जहाज अडकल्यामुळे सागरी वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे.
सुएझ कालव्यातील वाहतुकीचे नियंत्रण करणार्या कंपनीने किंवा इजिप्तच्या यंत्रणांनी या दुर्घटनेमागील नेमके कारण उघड केलेले नाही. पण एका इजिप्शियन अधिकार्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर आंतरराष्ट्रीय माध्यमांना याबाबत माहिती दिली. मंगळवारी या पट्ट्याला सोसाट्याच्या वादळाने तडाखा दिला होता. ताशी ५० किलोमीटर वेगाने वाहणार्या या वादळामुळे व त्यापाठोपाठ धडकलेल्या धूळीच्या वादळाने सदर जहाज कालव्याच्या किनार्याला धडकले, असे या अधिकार्याने म्हटले आहे.
सदर जहाजातील अधिकारी व कर्मचारी सुरक्षित आहेत. तसेच कुठल्याही कंटेनरचे नुकसान झालेले नाही. पण आशिया व युरोपला जोडणार्या या सागरी मार्गात जहाज अडकल्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे. या मार्गाने दिवसाकाठी ५० कंटेनर जहाजे प्रवास करतात. या कंटेनरमध्ये कोट्यवधी डॉलर्सचे इंधन, धान्य तसेच इतर साहित्यांचा समावेश असतो. हे जहाज गंतव्यस्थानी वेळेत न पोहोचल्यास मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे सदर कंटेनर जहाज सुरक्षितरित्या किनार्याला लावून मार्ग मोकळा करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
हिंदी महासागराला भूमध्य समुद्राशी जोडणारा सुएझ कालवा हा अत्यंत महत्त्वाचा सागरी मार्ग आहे. त्यामुळे या सागरी मार्गाची सुरक्षा अतिशय?महत्त्वाची ठरते. याआधी १९६७ साली झालेल्या इस्रायलबरोबरच्या युद्धात इजिप्तने सदर मार्गातील वाहतूक रोखून आंतरराष्ट्रीय व्यापाराची कोंडी केली होती. इजिप्तच्या सिनाई प्रांतातील दहशतवाद्यांकडूनही या कालव्यातील वाहतुकीच्या सुरक्षेला धोका असल्याचा इशारा आंतरराष्ट्रीय विश्लेषकांनी २०१४ साली दिला होता. तर काही आठवड्यांपूर्वी येमेनमधील हौथी बंडखोरांनी सुएझ कालव्यासाठी जाणार्या रेड सीमधील व्यापारी जहाजांवर हल्ले चढविल्याचे आरोप झाले होते.