बंगळुरू – आपल्या सीमेत घातपात घडविणाऱ्यांना धडा शिकविणाऱ्या अमेरिका व इस्रायल या देशांमध्ये आता भारताचा समावेश झाला आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. उरी व पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईक आणि हवाई हल्ल्याचा दाखला देऊन गृहमंत्र्यांनी हा दावा केला.
कर्नाटकच्या एका विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय गृहमंत्र्यांनी भारताच्या बदललेल्या सुरक्षाविषयक धोरणांचा पुरस्कार केला. आधीच्या काळात दहशतवादी हल्ल्यानंतर, त्याचा निषेध केला जात होता. पण 2016 साली झालेल्या उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर, तसेच 2019 सालच्या पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 10 दिवसांच्या आत पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईक व एअर स्ट्राईक केली. याचा काही परिणाम झालेला आहे का, असा प्रश्न काहीजण करतात, असे गृहमंत्री अमित शहा म्हणाले.
पण याचा जबरदस्त परिणाम झालेला आहे, असे मी सांगतो. कारण भारत आपल्या सीमेत घातपात खपवून घेणार नाही, हा संदेश आता साऱ्या जगाला मिळाला आहे. घातपाताला भारत जबरदस्त प्रत्युत्तर देतो, याची जाणीव जगाला झाली, हा फार मोठा बदल ठरतो, असे सांगून केंद्रीय गृहमंत्र्यांनी यावर समाधान व्यक्त केले. याबरोबरच जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे 370 कलम हटवून सरकारने फार मोठी कामगिरी केली, असा दावा गृहमंत्री शहा यांनी केला.
5 ऑगस्ट हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदविला जाईल. कारण या दिवशी कलम 370 हटविण्यात आले. यामुळे काश्मीरमध्ये रक्तपात होईल, असे इशारे दिले जात होते. पण आता जम्मू-काश्मीरमध्ये कुणी दगडफेक देखील करीत नाही, असे केंद्रीय गृहमंत्री म्हणाले. दरम्यान, देशाच्या सुरक्षाविषयक धोरणात झालेल्या या आक्रमक बदलांची दखल आता आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली जात असून काश्मीर प्रश्नाचे राजकारण करू पाहणाऱ्या पाकिस्तानला यामुळे फार मोठा धक्का बसलेला आहे.
पाकिस्तान सत्तेवर आलेले नवे सरकार काश्मीरचा प्रश्न सुटल्याखेरीज भारताबरोबर संबंध सुधारणार नाहीत, असे दावे करीत आहे. पण भारताने कलम 370 हटवून काश्मीर पाकिस्तानकडून हिरावून घेतले आहे. पुढच्या काळात ‘पाकिस्तानव्याप्त काश्मीर’ अर्थात ‘पीओके’ देखील भारताच्या ताब्या जाईल, अशी चिंता पाकिस्तानचे विश्लेषक व्यक्त करीत आहेत. भारताचे यशस्वी परराष्ट्र धोरण व आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढलेला प्रभाव लक्षात घेता काश्मीर प्रश्न आपल्या बाजूने सुटेल, याची आशा पाकिस्तानने सोडून द्यावी, असा सल्ला पाकिस्तानची माध्यमे आपल्या सरकारला देत आहेत.
भारताने आपली आर्थिक व राजकीय ताकद प्रचंड प्रमाणात वाढविली आहे. भारताची लष्करी तयारी चीनला टक्कर देण्याच्या पातळीवर गेलेली आहे. कोरोनाच्या साथीनंतर भारताचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्व अधिकच वाढलेले आहे. त्यामुळे पाकिस्तानसारख्या दुबळ्या व कंगाल देशाशी चर्चा करून काश्मीरचा प्रश्न सोडविणे ही आता भारताची गरज राहिलेली नाही. मात्र पाकिस्तानला आपला देश स्थिर ठेवायचा असेल, तर भारताशी चर्चा करावीच लागेल, असे इशारे पाकिस्तानातील काही सुजाण पत्रकार देत आहेत. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सरकारने यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन या पत्रकारांकडून केले जात आहे.