नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सर्व राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा अखेर रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला. केंद्रीय बॉर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर आता इतर राज्य सरकारेही आपपल्या राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षाही रद्द करण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्र्यांनीही केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत करून तसेच संकेत दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोनाच्या संकटामुळे गेल्यावर्षी दहावी व बारावी दोन्ही परिक्षा झाल्या नव्हत्या. यावर्षी ऐन परिक्षेपूर्वी पुन्हा कोरोनाच्या साथीची नवी लाट आल्याने परिक्षा पुढे ढकलाव्या लागल्या. मात्र साथींच्या सक्रमणाचा वेग वाढल्याने दहावीच्या परिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार इतर राज्य शिक्षण मंडळांनी असेच निर्णय घेतले होते. मात्र बारावीबाबत निर्णय अधांतरी होता. आधी एप्रिल, त्यानंतर मेमध्येही परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या व तारखांची घोषणा नंतर केली जाईल, असे जाहीर करण्यात आले.
मात्र बारावीच्या परिक्षाही रद्द कराव्यात अशी याचिका न्यायालयात दाखल झाली होती. न्यायालयाने बारावी परिक्षांबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिल्यावर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी सर्व राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांची बैठक घेतली होती. यावेळी सूचना मागविण्यात आल्या होत्या.
परिक्षा घ्यायच्या झाल्या तर त्या कशा घेण्यात यावेत यावर विचारविनिमय झाला. केवळ प्रमुख विषयांच्या परिक्षा घेण्याच्याही सूचना आल्या. या सर्व सूचनांवर विचार करून 1 जूनला पुन्हा सर्व शिक्षणमंत्र्यांच्या बैठक घेऊन तारखा घोषित केल्या जातील, असे सांगण्यात आले होते.
मात्र मंगळवारी झालेल्या बैठकीत या परिक्षा रद्द करण्यात आल्या. प्रकृती अस्वस्थ असल्याने यावेळी केंद्रीय शिक्षणमंत्री उपस्थित नव्हते. मात्र पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. केंद्रीय शिक्षण सचिवांसह सर्व राज्यांचे शिक्षणमंत्री यामध्ये सहभागी झाले होते. देेशात काही भागात अद्यात कोरोनाची स्थिती अटोक्यात आलेली नाही. काही ठिकाणी लॉकडाऊन सदृष्य निर्बंध आहेत. अशा स्थितीत विद्यार्थी आणि पालक दोघेही चिंतेत असून अशा तणावात विद्यार्थ्यांना परिक्षा देण्यासा भाग पाडता येणार नाही, असे पंतप्रधान म्हणाले विद्यार्थ्यांचे हित व सुरक्षा लक्षात घेत केंद्रीय बार्ड सीबीएसईच्या परिक्षा रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधानांनी जाहीर केला. त्यामुळे आता इतर शिक्षण मंडळांकडूनही असेच निर्णय होण्याची शक्यता आहे.
परिक्षा रद्द झाल्यावर आधीच्या परिक्षा व इतर बाबींचे मुल्यमापन करून निकाल देण्यात येणार आहेत. तसेच गेल्यावर्षीप्रमाणे परिक्षा देण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांना परिस्थिती सामान्य झाल्यावर परिक्षा देण्याचा पर्याय सीबीएसई उपलब्ध करून देणार आहे.