लष्करी बळाच्या जोरावर आशियातील स्थिती बदलण्याचा प्रयत्न करणार्‍यांविरोधात एकत्र यायला हवे

- जपानचे माजी पंतप्रधान शिंजो ऍबे

कौलालंपूर/टोकिओ – ‘काही देश लष्करी बळ तसेच आर्थिक दबावाच्या जोरावर आशियातील सध्याची स्थिती बदलण्याचे एकतर्फी प्रयत्न करीत आहेत. हे प्रयत्न आशियाच्या शांततेसाठी धोका असून आपण सर्वांनी त्याविरोधात एकत्र येऊन आवाज उठवायला हवा’, असे आवाहन जपानचे माजी पंतप्रधान शिंजो ऍबे यांनी केले. ऍबे मलेशियाच्या दौर्‍यावर असून त्यांचे हे वक्तव्य चीनला दिलेला इशारा असल्याचे सांगण्यात येते. दौर्‍यादरम्यान, जपान व मलेशियाने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर निर्माण झालेल्या ‘सप्लाय चेन क्रायसिस’चा मुकाबला करण्यासाठी एकत्र येण्याचे संकेतही दिले आहेत.

गेल्या काही महिन्यात चीनने ‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्रातील आपल्या कारवाया अधिक आक्रमक केल्या आहेत. तैवानविरोधात सातत्याने युद्धसरावांचे आयोजन करण्यात येत असून आग्नेय आशियाई देशांनाही धमकावण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर, आग्नेय आशियाई देशांनीही चीनविरोधात आक्रमक पावले उचलली आहेत. या देशांनी चीनच्या कारवायांना प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिका व जपानसह ऑस्ट्रेलिया, भारत व दक्षिण कोरियाचे सहाय्य घेण्यास सुरुवात केली आहेत.

जपानच्या माजी पंतप्रधानांचा मलेशिया दौराही त्याचाच भाग दिसत आहे. ऍबे यांनी जपानचे पंतप्रधान पद सोडले असले तरी ते सत्ताधारी पक्षातील वरिष्ठ व प्रभावशाली नेते म्हणून ओळखण्यात येतात. सध्या जपानकडून चीनबाबत उचलण्यात येणारी पावले हे ऍबे यांच्या आक्रमक धोरणाचेच परिणाम असल्याचे मानले जाते. त्यामुळे त्यांचा मलेशिया दौरा व त्यात चीनला दिलेला इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो. काही दिवसांपूर्वी ऍबे यांनी रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा संदर्भ देेऊन अमेरिकेला धारेवर धरले होते. रशियाने युक्रेनवर हल्ला चढविल्यानंतर चीनची आक्रमकता अधिकच वाढण्याची शक्यता आहे, असे जपानच्या माजी पंतप्रधानांनी बजावले होते. तैवानवरील चीनच्या हल्ल्याची शक्यता वाढली असल्याचेही त्यांनी म्हटले होते.

दरम्यान, मलेशियाचे व्यापार व उद्योगमंत्री दातुक सेरी मोहम्मद अझ्मिन अली यांनी ऍबे यांची भेट घेतली. या भेटीत मलेशिया व जपानने ‘सप्लाय चेन क्रायसिस’चा मुकाबला करण्यासाठी एकजुटीने पावले उचलण्यावर एकमत दर्शविले आहे. कोरोनाच्या काळात चीनने घेतलेल्या आडमुठ्या निर्णयांच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिका, युरोप, जपान यांनी जागतिक पुरवठा साखळीत बदल करण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून त्यासाठी भारतासह आग्नेय आशियाई देशांचे सहाय्य घेण्यात येत आहे.

चीनचे टेहळणी विमान ‘साऊथ चायना सी’मध्ये कोसळले – तैवानचा दावा

तैपेई – चीनच्या हवाईदलाचे ‘वाय-८ अँटी सबमरिन वॉरफेअर एअरक्राफ्ट’ हे टेहळणी विमान साऊथ चायना सीमध्ये कोसळल्याचा दावा तैवानने केला आहे. तैवानच्या ‘नॅशनल सिक्युरिटी ब्युरो’ने याबाबत माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वी व्हिएतनाममधील एका विश्‍लेषकाने मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चीनचे टेहळणी विमान पडल्याचा दावा केला होता. या विमानाचा शोध घेण्यासाठी चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ने तातडीने सरावाचे आयोजन केले, असे डुअन डँग या विश्‍लेषकांनी सांगितले. चीनच्या हैनान आयलंडनजिकच्या सागरी क्षेत्रात सदर विमान कोसळल्याचेही डँग म्हणाले होते.

leave a reply